पुणे : मनसे सोडलेल्या निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समजूत काढली आहे. आता त्यांना माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्षपदाला स्थानिक नेते विरोध करत असल्याने निलेश माझिरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता. वसंत मोरे यांनी शिवतीर्थावर निलेश माझिरे यांची राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत भेट घडवून आणत ही नाराजी दूर केली, अशी माहिती स्वत: निलेश माझिरे यांनी दिली आहे. निलेश माझिरे हे वसंत मोरेंचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची मनसेच्या माथाडी सेनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर माझिरे नाराज होते. तर वसंत मोरे (Vasant More) यांनीही या मुद्द्यावरून आपली खदखद व्यक्त केली होती.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर त्याचबरोबर कोअर कमिटीतील इतर सदस्य यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचे कारण निलेश माझिरे यांनी दिले होते. 19 मे रोजी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही ठिकाणी पाहण्यात आल्या होत्या. या प्रकारानंतर निलेश माझिरे यांची हकालपट्टी करा, असे साईनाथ बाबर म्हणाले होते. तर तू पक्षात राहणार आहेस का, अशी विचारणा बाबू वागस्कर यांनी केली होती. मला बोलावून घेऊन पक्षात राहणार आहात का, असे हे लोक विचारतात, असा सवाल माझिरे यांनी केला होता.
पक्षात मागील काही दिवसांपासून वसंत मोरे यांच्यानंतर निलेश माझिरे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र दोन्हीही नेते आपण पक्षातच असल्याचे सांगत होते. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील काही नेते त्यांना एकाकी पाडत असल्याचा आरोप या दोघांनीही केला होता. आता वसंत मोरेंनी माझिरे यांची राज ठाकरेंसोबत भेट घडवून आणली. त्यांना माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पददेखील देण्यात आले आहे.
पुण्यात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद असून तो सातत्याने चव्हाट्यावर येत आहे. वसंत मोरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर तो अधिक दिसून येवू लागला. वसंत मोरेंना पक्षात एकाकी पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर निलेश माझिरे हे त्यांचे समर्थक मानले जातात. त्यांनाही त्रास देण्यात आला. यावेळी साईनाथ बाबर, बाबू वागस्कर यांसह काही नेत्यांची नावे घेण्यात आली. सध्या राज ठाकरेंनी माझिरेंची समजूत काढली असली तरी हा वाद इतक्यात मिटेल, असे दिसत नाही. राज ठाकरे याप्रकरणी काय भूमिका घेतात, ते पाहावे लागणार आहे.