Yogesh Khaire : एमआयएम, सपाशी हातमिळवणी करायची अन् त्यावर पांघरूण घालण्यासाठी अयोध्येला जायचं; योगेश खैरेंची आदित्य ठाकरेंवर टीका
एमआयएम आणि सपाशी हातमिळवणी केली आणि आता यावर पांघरूण घालण्यासाठी ते अयोध्येला (Ayodhya) जात आहेत. सेटिंग कोणी केली, हे राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले आहे, असा टोला योगेश खैरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
पुणे : मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा सेटिंग करून करण्यात आला, असा आरोप मनसे नेते योगेश खैरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर मनसेने टीकास्त्र सोडले आहे. मनसेचे पुण्यातले नेते योगेश खैरे (Yogesh Khaire) हे या दौऱ्याविषयी टीका करताना म्हणाले, की आदित्य ठाकरे यांचा दौरा हा धार्मिक नाही, तर राजकीय आहे. औरंगाबादचा नामांतराचा विषय त्यांनी भाषणात गुंडाळला. एमआयएम आणि सपाशी हातमिळवणी केली आणि आता यावर पांघरूण घालण्यासाठी ते अयोध्येला (Ayodhya) जात आहेत. सेटिंग कोणी केली, हे राज ठाकरे यांनी भाषणात सांगितले आहे, असा टोलादेखील त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.
‘उत्तर भारतीयांनी नाही, एका व्यक्तीने केला होता विरोध’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार होते. मात्र वाढता विरोध पाहता त्यांनी आपला दौरा रद्द केला. कार्यकर्त्यांवर केसेस टाकण्याचे काही जणांचा कट असल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. यावर योगेश खैरे म्हणाले, की राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध हा उत्तर भारतीयांनी नाही, तर एका व्यक्तीने केला, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे भविष्यात निश्चितच दौरा करतील, असे योगेश खैरे म्हणाले.
काय म्हणाले योगेश खैरे?
‘राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर दौरा नाही’
शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे लखनौला उतरतील आणि अयोध्येत येतील. त्यापूर्वी ते इस्कॉन मंदिराला भेट देतील. 1.30 वाजता अयोध्येत त्यांचे आगमन होईल. 3.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. 4.45 वाजता इस्कॉन मंदिरात ते दर्शन घेतील. 5.30 वाजता राम लल्लांचे दर्शन, 6.30 वाजता शरयू तीरावर महाआरती, 7.30ला लखनौसाठी प्रस्थान करतील आणि तेथून मुंबईत परततील, असा हा दौरा असणार आहे. दरम्यान, कोणत्याही राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनाची आमची परंपराच आहे, असे स्पष्टीकरण शिवसेनेतर्फे देण्यात आले आहे.