पुणे : राज्यात मान्सून यंदा उशिराने दाखल झाला. बिपरजॉय या चक्रीवादळामुळे मान्सूनला यंदा उशीर झाला. २५ जूनपासून गेली चार दिवस पुणे, मुंबईसह राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे अन् मुंबईत गेल्या चार, पाच दिवसांपासून सूर्यदर्शनही झाले नाही. आता पुणे हवामान विभागाने पावसासंदर्भात महत्वाचे अपडेट दिले आहे. राज्यातील घाटमाथ्यावर अन् पश्चित भागांत पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात ३० जून ते ३ जुलैपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. या ठिकाणी यलो अलर्टही जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाडा अन् विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे. पुणे शहरासाठी १ जुलै ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. एकंदरीत मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते तुरळक पाऊस पडणार आहे. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस असणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात येते काही दिवस पाऊस सक्रिय राहणार आहे.
पुणे जिल्ह्यात लोणावळामध्ये गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस झाला. लोणावळामध्ये ८७ मिमी पाऊस झाला तर लवासामध्ये ६२ मिमी पाऊस पडला. उत्तर पुणे जिल्ह्यात पाऊस चांगला सुरु आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी गुरुवारी रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून शेतीकामांना वेग दिला आहे.
यंदा मान्सून उशिराने झाला. त्याचा परिणाम फक्त कृषी क्षेत्रावरच झाला नाही तर इतर उद्योग अन् व्यवसायांवरसुद्धा झाला आहे. मान्सून उशिरा आल्यामुळे पुणे अन् पिंपर चिंचवडसारख्या शहरात पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.