पुणे | 18 सप्टेंबर 2023 : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर वीकेंडला नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. सलग सुट्यांमुळे शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी झाली. या दोन दिवसांत चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा बोरघाटात लागल्या होत्या. परंतु सोमवारी बोरघाटामधील वाहतूक कोंडीतून दिलासा मिळला आहे. बोरघाट परिसरात आज वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईवरुन पुण्याला येणारी आणि पुण्यावरुन मुंबईला येणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जात असल्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहतूक वाढली होती.
पुणे शहरात मुलाचे अपहरण करुन खून करणाऱ्या ओंकार कापरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी कोंढवा येथील १६ वर्षीय मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर त्या मुलाचा मृतदेह दिवेघाटाजवळ आढळून आला होता. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे कोंढवा व वानवडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री विविध ठिकाणी छापे टाकून गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी दोन हजार ५४४ संशयितांची झाडाझडती घेऊन ७५७ गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. याऑपरेशनमध्ये ५५० हॉटेल, लॉज आणि ढाबे तपासण्यात आले होते.
राष्ट्रीय चालक दिनानिमित्त पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाक्यावर पोलिसांकडून चालकांना पेढे आणि गुलाबपुष्प देत सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना रस्ते वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. वाहतुकीचे सर्व नियम पाळून वाहन चालवणाऱ्या चालकांचे पोलिसांकडून विशेष कौतुक करण्यात आले. खेडशिवापूर येथील राजगड पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची वर्णी लागली आहे. तुषार कामठे हे काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुषार कामठे यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासाठी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, काशिनाथ नखाते यांची नावे चर्चेत होती.
पुणे येथील चांदणी चौकातील वाहतूककोंडीतुन पुणेकरांना रविवारी दिलासा मिळाला. चांदणी चौकात प्रथमच वाहतूक वाहतूक सुरळीत सुरु झाली. पुणे, बंगरुळू महामार्गासह चौकात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत झाली. चांदणी चौकात तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा असतात. परंतु रविवारी हे चित्र दिसले नाही. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले होते.