पुण्यात कोरोना लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी चाचपणी, चार कंपन्यांचा प्रतिसाद
नवीन कोल्ड स्टोअरेज उभारण्यापेक्षा कंपन्यांचे स्टोअरेज वापरण्याचा खर्च कमी येणार आहे.
पुणे : कोरोनावरील पहिली लस दृष्टीक्षेपात येताच विविध शहरांमध्ये कोल्ड स्टोरेजची सुविधा करण्यात येत आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडूनही कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. पुणे शहराच्या आसपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या कोल्ड स्टोअरेज कंपन्यांशी महापालिकेची चर्चा सुरु आहे. (Pune Municipal Corporation finding COVID Vaccine Cold Storage)
चार कंपन्यांनी लसीच्या स्टोअरेजसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नवीन कोल्ड स्टोअरेज उभारण्यापेक्षा कंपन्यांचे स्टोअरेज वापरण्याचा खर्च कमी येणार आहे. पुणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोल्ड स्टोरेज यंत्रणा उभारणीची चाचपणी केली होती.
स्वतंत्र कोल्ड स्टोरेज महागडं
कोरोना कोल्ड स्टोरेजसाठी स्वतंत्र यंत्रणा ही खर्चिक बाब आहे. त्याची देखभाल दुरुस्तीही महाग असून त्यानंतर कायमस्वरुपी त्याची गरज राहणार नाही. त्यामुळे हा खर्च न करता पालिकेने शहराच्या परिसरातील कोल्ड स्टोरेज लस साठवणुकीसाठी भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.
लसीकरण मोहिमेसाठी कृती दल
कोरोना लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा प्रशासन अधिकारी, तिन्ही कॅन्टोंमेंटचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आदींसह शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना या विभागप्रमुखांचा समावेश आहे.
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील 31 हजार 915 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येकी दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत.
मुंबईत कोल्ड स्टोरेजची जागा निश्चित
मुंबईत शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर येथील तीन जागांचा लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी विचार सुरु आहे. मात्र पूर्व उपनगरातील कांजुर-भांडुपजवळील एक जागा निश्चित होत आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाय योजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation finding COVID Vaccine Cold Storage)
मोदींची सीरम इन्स्टिट्यूटला भेट
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केल्या जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्यासाठी 28 नोव्हेंबरला ते पुणे दौऱ्यावर होते. मोदींनी अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मित केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. तर ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे.
कोरोनाच्या लसीसाठी खास सॉफ्टवेअर
कोरोनाच्या लसीकरणासाठी खास सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. लसीचा साठा आणि त्याची मागणी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचालित केली जाणार आहे. या लसीकरण अभियानाबद्दल देशात गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी मिळून अफवेपासून दूर राहावं, आणि जनतेलाही जागरुक करावं अशी मागणी त्यांनी केली.
संबंधित बातम्या :
कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची तयारी, मुंबईत कोणती जागा निश्चित?
भारतातील पहिली कोरोना लस दृष्टीपथात, पंतप्रधानांची खुशखबर, किंमत-लसीकरण प्लॅनचीही माहिती
(Pune Municipal Corporation finding COVID Vaccine Cold Storage)