पुणे : भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुण्यात (Pune) आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून आज बालगंर्धव चौकात राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. चित्रा वाघ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांचा खोडेपणा उघड झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. पीडित तरुणीला खोटे बोलायला लावल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीने आपली तक्रार मागे घेतली. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले, असे तरुणीने म्हटले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही स्पष्टीकरण देत आपण पीडितेची मदत केली ही चूक केली काय, असा सवालही केला होता. दरम्यान, पीडित तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील केस मी मागे घेणार आहे. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर कुठलाही दबाब नाही. माझ्यासोबत जे घडले आहे ते खरे आहे. मात्र मला, माझ्या कुटुंबीयांना धोका असल्यामुळे मी केस मागे घेत आहे. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा पीडित तरुणीने आरोप केला आहे. तर चित्रा वाघ यांच्याविरोधात अद्याप तक्रार दिली नाही, असेही या तरुणीने म्हटले आहे.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. कोणताही विचार न करता राजकारण केले गेले. पीडितेला कुणी मदत केली नाही, हा चुकीचा आरोप आहे. अशा घटना घडल्या, त्यावेळी पोलिसांनी दखल घेतली आहे. दिरंगाई झाली असेल तर लक्ष घालणे सर्वाचे काम आहे. मात्र चित्रा वाघ या रोज ज्या वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या. त्याचा मुलीवर काही परिणाम झाला आहे का? याचीही माहिती घेतली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.