पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या सात वर्षांमध्ये देशातील महागाई (Inflation) आणि बेरोजगारी कमी करण्यामध्ये अपयश आले आहे. हे अपयश लपवण्यासाठी जाती- जातींमध्ये धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज राज्यातील सर्व जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये वाढत्या महागाई विरोधात भोंगा आंदोलन करत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. स्वारगेट येथे हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारचा जाहीर निषेध यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, की एखाद्या सरकारसाठी सात वर्षे हा कालावधी खूप मोठा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना महागाई व बेरोजगारीबाबत जे आश्वासन दिले होते ते अद्यापही पूर्ण करता आलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, की या सात वर्षात क्रूड तेलाच्या बॅरेलची किंमत ही 100 डॉलरच्या आत होती, अशा वेळीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम कंपन्यांना फायदा करून दिला. मागील पाच वर्षाच्या कालावधीत जवळपास वीस लाख हजार कोटींचा फायदा या पेट्रोलियम कंपन्यांना करून दिला आहे. केंद्रातील एक्साइज ड्युटीही 32 रुपयांवर नेली आहे. यूपीए सरकारच्या काळात 9 रुपये आणि 14 रुपये होती. परंतु या 7 वर्षाच्या कालावधीत ती 5 ते 6 पटीने वाढवून सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे वसूल केले आहेत, असे ते म्हणाले.
स्वतःला चौकीदार म्हणवून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकीदारालाच विचारावे, की दहा बारा हजारात घर कसे चालवता? कारण चौकीदाराचा पगार असतो बारा हजार रुपये. त्यामध्ये त्याला आई वडील, बायको, मुले असा सहाजणांचे कुटुंब चालवायचे असते. घराचे भाडे 5 हजार, किराणा 6 हजार, दूध 1 हजार, भाजीपाला 1 हजार, गॅस 1 हजार रुपये असे 14 हजार रुपये महिन्याला लागतात. पगार बारा हजार रुपये आणि खर्च चौदा हजार रुपये, अशा परिस्थितीत घर चालवायचे कसे, असा प्रश्न पडतो. महत्त्वाचे म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखाण्याचा खर्च, तसेच बाप म्हणून मुलांना काही घ्यायचे म्हटले तरी खिशात एक रुपया उरत नाही. 2 ते 3 हजार उसने घेऊन जगावे लागते. आता देशाचे चौकीदार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगावे सामान्यांनी या महागाईत जगायचे कसे, असा सवालही रविकांत वरपे यांनी यावेळी केला.