अभिजित पोते, पुणे : राज्यातील राजकारणात मोठा भूकंप रविवारी झाला. वर्षभरानंतर झालेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. त्यांनी आपला वेगळा गट तयार करत राज्यातील सत्तेत वाटा मिळवला. त्यांच्यासोबत नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर शरद पवार मैदानात उतरले. त्यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेऊन रणशिंग फुंकले. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या सर्व घडामोडी सुरु असताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या गटाबरोबर जाणार? हा निर्णय आज होणार आहे.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी दुपारी पुणे शहरात बैठक होणार आहे. पुण्यातील घोले रस्ता येथील नेहरू सांस्कृतिक भवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची बैठक होणार आहे. बैठकीला शहरातील आजी-माजी आमदार, खासदार, नगरसेवक पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पुणे शहरात पार पडणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही बैठक बोलवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत कोणाला पाठिंबा द्यावा, यासंदर्भात निर्णय होणार आहे. अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा की शरद पवार यांना पाठिंबा द्यावा, हा निर्णय सर्वांशी चर्चा करुन घेण्यात येणार आहे. बैठकीला पुणे शहरातील पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर काही तासांत त्यांनी आपला निर्णय बदलला. आपण शरद पवार यांच्या गटात असल्याचे त्यांनी ट्विट करत जाहीर केले. ते पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदार संघातील खासदार आहेत. हिंगोलीचे आमदार राजू नवघरे हे शरद पवार यांच्या गटात दाखल झाले आहे. रविवारी ते अजित पवार यांच्याबरोबर होते. परंतु त्यानंतर ते आपण शरद पवार यांच्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.