Pune Ravikant Varpe : ‘बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तरी आश्चर्य वाटणार नाही’
राज ठाकरे (Raj Thackeray) हे संघाच्या (RSS) पूर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत, हे भाषणावरून समजते, उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे.
पुणे : महाराष्ट्राचे बहुरूपी नेते राज ठाकरे (Raj Thackeray) हे संघाच्या (RSS) पूर्णपणे बाहुपाशात गेलेले नेते आहेत, हे भाषणावरून समजते, उद्या बहुरूपी राज ठाकरेंनी संघाची चड्डी घातली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे. 370 कलम, काश्मिरी पंडितांवरील अन्याय, समान नागरी कायदा, मशिदीवरील भोंगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुद्दे आहेत, जे राज ठाकरे भाषणातून मांडताहेत, असे वरपे म्हणाले. शरद पवार साहेब हे जातीयवादी नेते, देव-धर्म मानत नाहीत, एका धर्माचे लांगुलचालन करीत आहेत, हा प्रचार संघ गेली गेली अनेक दशके शरद पवार यांच्या विरोधात करत आहे. आज फक्त राज ठाकरे सभेच्या माध्यमातून मांडत आहेत, हे स्पष्ट झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते भाषणाची स्क्रीप्ट
रविकांत वरपे पुढे म्हणाले, की राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून येते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही ते यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीवर आणि पवार कुटुंबीयांवर काल त्यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आक्रमक, सडेतोड प्रतिक्रिया येत आहेत. विविध नेत्यांनी राज ठाकरेंचे मुद्दे खोडून काढले आहेत. देशात, राज्यात इतर ज्वलंत मुद्दे असताना अशाप्रकारचे भावनिक मुद्दे घेणे एकप्रकारचे मनोरंजन असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
महाराष्ट्रात जातीवादाचे विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच पेरले गेल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असे म्हणत नाहीत. कारण, त्यांना मुस्लीम मते दुरावण्याची भीती वाटते, असा घणाघातही राज ठाकरे यांनी केला. त्याव्यतिरिक्त सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या नेत्यांवरही त्यांनी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीने उत्तर दिले आहे.