Pune Neelam Gorhe : हे सगळे फडतूस लोक, यांना राजकारणाचा सिनेमा करायचाय; पुण्यात नीलम गोऱ्हेंचा राणा दाम्पत्यावर निशाणा
पुण्यात आज शिवसेनेचा (Shivsena) संपर्क मेळावा आहे. त्यासाठी त्या पुण्यात आहेत. यानिमित्त गणेश कला क्रीडा मंच सभागृहात शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा समाचार घेतला.
पुणे : नवनीत राणा (Navneet Rana) या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात आणि सध्या त्या तेच करत आहेत. आपण काय आहोत याचा विचार त्यांनी केला पाहिजे. हे असले सगळे फडतूस लोक आहेत, त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे असे दिसत आहे, असा संताप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केला. त्या पुण्यात बोलत होत्या. पुण्यात आज शिवसेनेचा (Shivsena) संपर्क मेळावा आहे. त्यासाठी त्या पुण्यात आहेत. यानिमित्त गणेश कला क्रीडा मंच सभागृहात शिवसैनिकांनीही मोठी गर्दी केली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा समाचार घेतला. मुंबई महापालिका, राज ठाकरे, भाजपा आदी विषयांवरही त्यांनी मत व्यक्त केले. मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
‘कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात’
कावळ्याच्या शापाने गायी मरत नसतात. आपण कोण आहोत, काय आहोत याचा विचार न करता कोणीही फडतूस माणसे अशाप्रकारचे विचार मांडत असतील, तर त्याचा विचार करायला हवा. त्या खासदार आहेत. जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा सोडून अशाप्रकारची बेफाम वक्तव्ये करू शकतात, त्या अभिनेत्री आहेत. त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी नवनीत राणांवर केली. उद्धव ठाकरेंनी एकदा तरी हनुमान चालिसा वाचून दाखवावी. उद्धव ठाकरे महाराष्ट्रावरचे शनि आहेत, अशी वक्तव्ये राणांनी केली होती, त्यावर गोऱ्हे यांनी टीकास्त्र सोडले.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
‘मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार’
आमचा अंदाज चुकला तर हुतात्मा चौकात येवून दिलगिरी व्यक्त केरेल. मात्र मी आव्हान देते की जे बोलतायत त्यांनी त्यादिवशी येवून दिलगिरी तर व्यक्त करावीच, मात्र सहा महिने लोकांची दिशाभूल केल्याबद्दल उठाबशाही काढाव्यात, असे आव्हान त्यांनी भाजपाला दिले. तर राज ठाकरे हे वैफल्यग्रस्त आहेत. त्यामुळे सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करतात. कारण त्यामुळे त्यांचे महत्त्व वाढते आणि सुरक्षाही मिळते, असा टोला गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 18 खासदार आणि जवळपास 63 आमदार हे जनतेच्या प्रेमामुळे मिळाले आहेत. त्यांच्या हाती मात्र काहीही नाही, त्यामुळे त्यांना वैफल्य आल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. दरम्यान, शिवसेनेच्या या मेळाव्यास खासदार संजय जाधव, सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे, शहराध्यक्ष संजय मोरे आदींची उपस्थिती होती.