Chandrashekhar Bawankule : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीच जिंकणार; भाजपला विश्वास
BJP Leader Chandrashekhar Bawankule on Pune and Baramati Loksabha Election 2024 : येत्या लोकसभा निवडणुकीला आम्ही 'इतक्या' जागा जिंकणार; चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकडा सांगितला. पुणे आणि बारामतीची खासदारकीच्या जागेवरही त्यांनी दावा सांगितला आहे. वाचा सविस्तर...
अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 22 ऑक्टोबर 2023 : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. मात्र त्याआधीच ही निवडणूक लढण्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जनता आम्हालाच निवडून देईल, आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे दौऱ्या दरम्यान विजयाचा विश्वास व्यक्त केला. पुणे आणि बारामतीची खासदारकीची जागा महायुती जिंकेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पुणे आणि बारामतीच्या लोकसभेच्या जागेवरून चंद्रशेखर बवनकुळे यांचा महाविकास आघाडीला पुन्हा इशारा दिलाय. येत्या निवडणुकीत राज्यात 45 खासदार निवडून आणूच, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
दरम्यान, भाजप युवा मोर्चा बारामती लोकसभा अध्यक्षा अंकिता पाटील यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. देशात A फोर अमेठी झाले त्याच पध्दतीने B फोर बारामती होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच खासदार होणार आहे, असं अंकिता पाटील म्हणाल्या आहेत. पक्ष बांधणीसाठी अंकिता पाटील पुरंदर दौऱ्यावर असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंकिता पाटलांनी घेतला बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तेव्हा त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी जारांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यावर सरकार नक्कीच याची दखल घेईल. सर्व पक्ष, महाराष्ट्र राज्य,आपलं विधीमंडळ मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यांच्या अल्टीमेटमचा सरकार नक्की विचार करेल. त्यासाठी समिती स्थापन केली आहे. आम्ही देखील आरक्षणाच्या बाजूने आरक्षणाच्या विरोधात कुणीच नाही. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतो आणि म्हणून पुढची भूमिका देवेंद्रजी अजित पवार आणि एकनाथ शिंदे घेतील. मराठा आरक्षणसाठी सरकार सकारात्मक आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचं संपूर्ण काम सरकारने बघितलं आहे. गृहमंत्री सगळा रिपोर्ट घेऊन आपल्या समोर येतील. तो रिपोर्ट विधिमंडळात सुद्धा येईल. संपूर्ण तपासाची वाट बघावी, यात कुणीही बाधा आणू नये. सत्य समोर येईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.