पुणे : आज महाराष्ट्र दिन आहे. त्यानिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजीनगरच्या पोलीस ग्राऊंडवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पोलीस खात्याला नवीन बोलेरो गाड्या मिळाल्या आहेत. 25 नवीन गाड्यांचा पोलीस दलात समावेश झाला. या गाड्या चंद्रकांत पाटलांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.
चंद्रकांत पाटलांना श्वान पथकातील ऑस्कर या श्वानानं मानवंदना दिली आहे. ऑस्कर या श्वानानं पथसंचलन करताना मानवंदना दिली. ऑस्कर हा श्वान मैदानात आल्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या.
आपला विभाग अधिक अद्ययावत करा. आम्ही वाहन तर देऊच मात्र नवीन तंत्रज्ञान येतंय. ते तंत्रज्ञान अद्ययावत करा, असा सल्ला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पोलीस दलाला दिला.
महाराष्ट्र स्थापनेच्या आपणास शुभेच्छा! हुतात्म्यांच्या स्मृती अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो. आपल्या राज्याला राज्यगीत मिळालं आहे. त्याचा आनंद आहे. महाराष्ट्र सुधारक, गडकिल्ले, ही आपली ओळख आहे. या सगळ्याची जपणूक करणं गरजेचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
1960 साली आजच्या दिवशी आपल्या महान महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हे राज्य घडवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 108 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांना विनम्र अभिवादन! आज भारत देश विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे, त्यात आपल्या महाराष्ट्राचं सर्वात मोठं योगदान आहे. सर्व महाराष्ट्रीय बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!, असंही ते म्हणालेत.
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा !
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा !
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !#महाराष्ट्र_दिन #१मे #जय_महाराष्ट्र #Maharashtra #MaharashtraDin #MaharashtraDay #maharashtramajha pic.twitter.com/PHAMOQGn0q— Chandrakant Patil (@ChDadaPatil) May 1, 2023
अर्थसंकल्पात गतीमानतेचं प्रतीक दिसून आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभं करण्यात येणार आहे. गडकिल्ल्यांसाठी 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असंही चंद्रकातं पाटील यांनी सांगितलं आहे.
भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. शासनाने कायम शेतकऱ्यांच्या कल्याणाला पाठिंबा दिला आहे. 4 हजार 200 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यात पीककर्ज वाटण्यात आलंय. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी परिस स्पर्श योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात 403 शाळांचा विकास केला जाईल, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
पुण्यात पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बाह्यवळण मार्गाचं काम सुरू झालं आहे. समान पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.