अभिजित पोते, पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार नेहमी चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही आहे. त्यावेळी अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. अन् ते नॉट रिचेबल झाले होते. परंतु आता अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली गेली आहे. अजित पवार यांच्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले गेले आहे. विशेष म्हणजे ही तक्रार ज्या पक्षासोबत अजित पवार जाणार आहे, त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.
काय आहे प्रकरण
अजित पवार यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार दिली गेली आहे. पुणे शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांने ही तक्रार दिली आहे. भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून काही कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय पोलीस घेणार आहे.
का आहे धोका
गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहे. त्यानंतरही या प्लॉटची मोजणी केली जात होती. हा प्लॉटचा रवींद्र साळगावकर यांच्याकडे आहे. यामुळे त्यांना सतत धमकी येत आहे, असे साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवार यांच्यांकडून अद्याप काही स्पष्टीकरण दिले गेले नाही. पोलिसांनी रवींद्र साळगावकर यांचा जबाब घेतला आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आहे. त्यावेळी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेत्याविरोधात सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्याने तक्रार दिली आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
अंजिल दमानिया यांच्या त्या ट्विटची चर्चा
अजित पवार यांच्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच. बघू…..आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.