पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.तसेच हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रोचं लोकार्पण करणार आहेत. सोबतच अनेक कार्यक्रमही नियोजित आहेत. या दौऱ्यामुळे पुण्यात उद्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहेत. सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेदरम्यान हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे बंद असलेल्या मार्गांवरुन शक्य असल्यास प्रवास टाळावा, असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.तसेच पुणेकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलंय.
अलका चौक, स्वारगेट, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, पुणे विद्यापीठ चौक, टिळक रोड, शिवाजी चौक, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, सिमला ऑफीस चौक, संचेती चौक, संगमवाडी रोड, गोल्फ कल्ब चौक, विमानतळ रोड, स गो बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक आणि सेवासदन चौक हे प्रमुख मार्ग सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. केंद्रीय पोलीस आणि पुणे पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. मोदी ज्या ज्या मार्गावरुन जाणार आहेत, त्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात आली आहे. तसेच पंतप्रधानांच्या ताफ्यातील कार ही पुण्यात दाखल झालीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो 2 मार्गाचं उद्घाटन करणार आहेत. फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट मेट्रो मार्गाच उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. गरवारे कॉलेज ते रुबी बॉलपर्यंतच्या मेट्रो मार्गाच लोकार्पण केलं जाईल. पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होईल. त्यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
दरम्यना मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मनसे विद्यार्थी सेनेने शिक्षण आयुक्तांना निवदेन दिलं आहे.
मंगळवारी पुणे शहरात होणारे सर्व कार्यक्रम हे मध्यवर्ती ठिकाणी पार पडणार आहेत. सकाळी अनेक प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय सुरू असतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रास होऊ शकतो. हा त्रास टाळण्याासाठी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मनसेची आहे. त्यामुळे मनसेच्या या मागणीबाबत शिक्षण आयुक्त काय निर्णय घेतात, याकडेही लक्ष असणार आहे.