प्रदीप कापसे, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीचा आणखी एक वाद आता समोर आला आहे. हॉटेल वैशालीच्या मालक असलेल्या निकिता शेट्टी यांनी पतीवर आरोप केलेत. आता त्यांच्या चार वर्षाच्या मुलीला घेऊन त्यांचा पती मागील दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुलीला शोधून द्यावे आणि पतीला अटक करण्यात यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ का करत आहेत, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
हॉटेल वैशालीची पावर ऑफ अटर्नी बंदुकीचा धाक दाखवून पतीने नावावर करून घेतल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी कौटुंबीक छळाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
निकिता शेट्टी म्हणाल्या, विश्वजित जाधवने मला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर माझा पॉवर ऑफ अटर्नी घेतला होता. त्यावरून संपूर्ण प्रापर्टीजचे गिफ्ट डीड केले होते. घर, फार्म हाऊस, पैसे माझ्याकडे काहीच राहिले नव्हते. चार वर्षांची मुलगी आहे.तिला घेऊन त्याने मला ब्लॅकमेल केले होते.
१८ जूनला पोलिसांत गुन्हा नोंदवला. आता तो फरार झाला. दोन महिन्यांपासून मुलीला बघीतले नाही. त्याने पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले. दोन महिन्यांपासून मुलीशी बोलले नाही. भेटलीसुद्धा नाही. तो माझ्या मुलीला घेऊन गेला. पोलीस तपास सुरू आहे. मला माझी मुलगी पाहिजे. प्रापर्टीची केस सुरू आहे, असंही शेट्टी यांनी सांगितलं.
पोलिसांवर दबाव असावा. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधावं. माझ्या वडिलांनी खूप कष्टाने हे हॉटेल बनवले आहे. १८ जूनपासून तो फरार झाला, असंही वैशाली शेट्टी यांनी सांगितलं. माझ्या वडिलांनी हॉटेल उभं केलं. त्याने माझ्याकडून जबरजस्तीने सर्व संपत्ती हिसकावून घेतली. माझ्या वडिलांची पुण्याई असल्याने मला लोकं मदत करतात. पण, आता मला माझी मुलगी हवी, अशी मागणी निकीता शेट्टी यांनी केली.