प्रदिप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 20 मार्च 2024 : स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून मार्गदर्शन करणारे नितेश कराळे गुरुजी आता एका नव्या वाटेवर चालण्यासाठी सज्ज झाले आहेत. विद्यार्थ्यांचे लाडके कराळे गुरुजी आता राजकारणात येण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या रणांगणात उरतण्याची तयारी कराळे गुरुजींची आहे. अशात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी नितेश कराळे पुण्यात दाखल झाले आहेत. आज शरद पवार विविध मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. अशातच कराळे गुरुजी शरद पवारांना भेटण्यासाठी पुण्यात आले आहेत.
नितेश कराळे हे लोकसभा लढण्यास उत्सुक आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघातून आपल्याला तिकीट देण्यात यावं, अशी कराळे गुरुजींची मागणी आहे. याचबाबत चर्चा करण्यासाठी ते आज पुण्यात आहेत. थोड्याच वेळात शरद पवार आणि कराळे गुरुजी यांची भेट होणार आहे.
मी मागे काहीवेळा शरद पवारसाहेबांच्या भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्धा मध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे. प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो आहे. महाविकास आघाडी मधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक आहेत, असं कराळे यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले.
असंविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत. त्यामुळे एक तरुण पिढी आणि युवकांनी राजकारणात यावी असं त्यांचं मत आहे. मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे. संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय निश्चित होईल. अपक्ष लढतीच्या बाबत आता सांगता येणार नाही, असं कराळे गुरुजी म्हणाले.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम म्हटलं की तो अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतं. पण किचकट विषय सोप्या शैलीत विद्यार्थ्यांना शिवणारे कराळे गुरुजी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कराळे गुरुजींची स्टाईल तरूणांना अधिक आकर्षित करते. शिक्षक असणारे कराळे गुरुजी आता लोकसभच्या रिंगण्यात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.