रणजित जाधव, पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात रविवारी रात्री धक्कादायक घटना घडली. टँकरमधून गॅसची चोरी होत होती. त्यावेळी एकामागे एक गॅस टाक्यांचा स्फोट होऊ लागला. स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील लोक घाबरले. रात्री झोपेत असताना उठून अनेक जण रस्त्यावर आले. या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. त्यामुळे विद्यार्थीही बाहेर आले. पिंपरी चिंचवड येथील ताथवडे येथे ही घटना घडली आहे.
पिंपरी चिंचवडमधील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. या घटनेत तीन ते चार स्कूल बस ही जळून खाक झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये रविवार लागलेली भीषण आग ही गॅस चोरीच्या काळाबाजाराने लागल्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे. नऊ टाक्यांचा स्फोट झाल्यामुळे ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. त्याचवेळी आगीच्या रौद्ररूपामुळे गॅस चोरी करणाऱ्या लोकांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
गॅस टँकरचा स्फोट झाला त्या परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. यामुळे या भागांत अनेक हॉस्टेलसुद्धा आहेत. सुदैवाने स्फोटामुळे लागलेल्या आगीच्या कचाट्यात परिसरातील घरे आली नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मात्र यावेळी रस्त्यावर उभी असलेली शाळेतील तीन वाहने जळून खाक झाली आहेत. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेल्या आगीची माहिती त्वरित अग्नीशमन दलास देण्यात आली. त्यानंतर काही वेळेत अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर पावणे बाराच्या सुमारास आग नियंत्रणात आली. त्यानंतर गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी अजून एक तास लागला. पिंपरी चिंचवडमध्ये राजरोसपणे गॅस चोरीचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती या घटनेमुळे बाहेर आली. ही गॅस चोरी होत असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि गॅस एजन्सीला ही बाब लक्षात कशी आली नाही? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.