पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात नेहमी घरफोडया करुन फरार होणाऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस होते. त्याने दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या केल्या होत्या. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले गेले. नेहमीचकवा देऊन तो फरार होत होता. गुन्हेगारांचे अपराध कधीतरी पूर्ण होतात, त्या पद्धतीने त्याच्या अपराधांचा कोटा पूर्ण झाला अन् अखेर पुणे पोलिसांच्या सापळ्यात तो आला. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे येथील कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर हडपसर, बिबवेवाडी, सासवड, अलंकार, लोणीकंद, खेड, कोथरूड, दत्तवाडी, पंढरपूर, वानवडी पोलीस ठाण्यावर गुन्हे दाखल होते. संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (40, रा. थेऊर रोड, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 37 तोळे वजनाचे 22 लाख 20 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले.
आरोपी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला कोंढवा पोलिसांनी पकडले आहे. तो मध्यरात्रीच्या सुमारास साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याच्यावर यापूर्वी दीडशे घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. परंतु अनेक वर्षांपासून तो फरार होता. पोलिसांना सापडतच नव्हता. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्यात तो अडकला.
संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासात यासंदर्भात काय माहिती उघड होते, हे ही आता काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. आरोपी कल्याणी याने फक्त पुणे शहरात घरफोड्या केल्या की इतर ठिकाणी केल्या, हे आता स्पष्ट होणार आहे.