चोर पोलिसांना घाबरले, पोलीस चोरांना घाबरले; मग काय घडलं? वाचा!
पुण्यात ज्या चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
पुणे : पुण्यात ज्या चोरट्यांना पाहून पोलिसांनी पोबारा केला होता, त्याच चोरट्यांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. मुळात हे चोरटेच पोलिसांना घाबरले होते. म्हणूनच या चोरट्यांनी घटना घडली तेव्हा आरडाओरडा केला होता. पण या गोंधळात चोरट्यांना घाबरून पोलिसांनाच पळ काढला होता. 28 डिसेंबरला चतुशृंगी हद्दीत घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती (Pune Police Crime Branch Unit 3 arrest robbers gang).
चतुशृंगी हद्दीत घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पुणे पोलीस पळपुटे आहेत, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पोलिसांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या चोरट्यांना जेरबंद करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं. अखेर त्या चौघांपैकी तिघांना बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. आधी बिंतु सिंग कल्याणी या आरोपीला अटक करण्यात आलं होतं. आज बिरजू सिंग दुधानी, सनी सिंग दुधानी यांना अटक करण्यात आली.
अशाप्रकारे पोलिसांनी नामुष्की सहन केल्यानंतर 4 पैकी 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील चौथा आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. आत्ता अटक करण्यात आलेल्या दोघांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकूण 77 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलीय.
कारवाई कशी झाली?
पोलिसांना मिळालेल्या बातमीवरून रेकॉर्डवरील शिकलकरी गुन्हेगार, सनीसिंग पापासिंग दुधानी याला शेवाळवाडी जकात नाका (पुणे) येथे सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साथीदार बिरजुसिंग दुधानी, लकीसिंग टाक यांच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेला आरोपीविरोधात पुणे शहर पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी चोरी, वाहन चोरी असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार बिरजूसिंग रजपुतसिंग दुधानी यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्या विरुद्ध पुणे शहर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी, चोरी, वाहन चोरी असे एकूण 51 गुन्हे दाखल आहेत.
आरोपी सनीसिंग दुधानी व बिरजूसिंग दुधानी यांचेकडून सोने-चांदीचे दागिने, तिजोरी रोख रक्कम तसेच चोरी केलेले सोन्याचे दागिनेतील काही दागिने मोडून त्यातून खरेदी केलेली KTM मोटरसायकल आणि घरफोडी चोरीचे गुन्हे करण्यासाठी वापरलेली चोरीची मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. आरोपींकडून सर्व मिळून 12 लाख 43 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
हेही वाचा :
200 लोकांचा पर्सनल डाटा विकणारे अटकेत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
पॉर्न रॅकेटमध्ये हिरोईन, समजून घ्या रॅकेटचे सर्व धागेदोरे, कोण हिरोईन, कोण दलाल?
व्हिडीओ पाहा :
Pune Police Crime Branch Unit 3 arrest robbers gang