पुणे : कोरोनामुळे (Corona) दोन वर्षानंतर साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली आहे. पुण्यात यंदा रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. दहीहंडीच्या दिवशी पुणे पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवणार आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहेत. दहीहंडीच्या (Dahi Handi) पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर वाहतूक पोलिसांचे (Pune city Police) आवाहन केले आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.
पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतुकीमध्ये बदल केला आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली आहे. पुण्यात प्रत्येक दहीहंडीच्या दरम्यान वाहतुक कोंडी होत असते त्यामुळे यावर्षी प्रशासनाने नवा निर्णय घेतला आहे.