रणजित जाधव, मावळ, पुणे : पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. किशोर यांची हत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी केली, असा आरोप किशोर आवारे यांच्या आईने केला होता. त्यानंतर या आमदाराचं नावही एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु या प्रकरणात आता माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्याच्या २४ तासांत चार आरोपींना पकडले. त्यानंतर सूत्रधारापर्यंतही पोहचले. यामुळे या प्रकरणात पुणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
किशोर आवारे यांची हत्या करणारे चार आरोपी होते. हल्लेखोरांनी खून केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी दोन मोटारसायकली चोरल्या. याप्रकरणी मोटारसायकलच्या ३८ वर्षीय मालकाने पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर २४ तासांत पोलिसांनी चक्र फिरवली. या प्रकरणात प्रवीण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेश मंदिराजवळ, आकुर्डी) यांना अटक केली.
पोलीस कसे पोहचले सूत्रधारापर्यंत
एसीपी पद्माकर घनवट यांनी सांगितले की, पोलिसांनी चारही आरोपींची कसून चौकशी सुरु केली. त्यांचे मोबाईल तपासले. त्यांच्या लोकेशनचे अॅनालिसस केले. त्यानंतर या प्रकरणाचा संबंध गौरव खळदे यांच्याशी असल्याचे समोर आले. मग त्याला ताब्यात घेतले आहे.
कोण आहे गौरव खळदे
गौरव खळदे हा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा आहे. त्यानेच ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. तेव्हा आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची क्रूर पद्धतीने हत्या केली, असे एसीपी पद्माकर घनवट यांनी सांगितले. आरोपींनी गौरव खळदे याने दिलेल्या सुपारीवरुन ही हत्या केल्याची कबुली दिली, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.