अल्पवयीन कारचालक बनले यमदूत, पिडीतांना न्याय केव्हा, कायदा बनला केवळ फार्स
पुण्याच्या आयटी हब कल्चरचे वास्तव किती भयानक आहे हे अल्पवयीन मुलाने बापाची करोडोची कार दोघा आयटी इंजिनियरच्या अंगावर बेफाम चालवून सिद्ध केले आहे. बिल्डरचा मुलगा असल्याने पुण्याच्या येरवडा पोलीसांना आणि बाल हक्क न्यायालयालाही दोन जीवांचे मोल कळले नाही असेच या 15 तासात मिळालेला जामीन आणि निबंध लिहीण्याच्या शिक्षेवरुन वाटते आहे.
मुंबई – पुण्यातील कल्याणीनगरात एका बेफाम कार चालकाने एका पल्सर बाईकला प्रचंड वेगाने उडविल्याने त्यावर बसलेल्या तरुण आणि तरुणींचा हकनाक बळी गेल्याची घटना शनिवार 18 मे रोजी रात्री मध्यरात्री घडली. या भीषण अपघातात आलिशान महागड्या पोर्श कारचा चालक हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयाने लागलीच जामीन मंजूर केल्याने समाजात संतप्त भावना उमटल्या आहेत. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मद्य पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले होते. आरोपीने केलेला गुन्हा पाहाता त्याला सज्ञान समजून त्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यास वेळ लावल्याने पुणेकर संतप्त झाले. या प्रकरणात प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर पुणे पोलिसांना उपरती होत त्यांना आरोपी मुलगा वेदांत अगरवाल ( 17 ) याचे पालक बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
अशा प्रकारच्या ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’ प्रकरणात आतापर्यंत अनेक श्रीमंत धनदांडगे पोलिसी कारवाईतून आरामात सुटले आहेत. या संदर्भातील कायद्यात तरतूद असूनही पोलिसांकडून आवश्यक कलमे लावली जात नसल्याने आरोपींना जामीन मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांकडे नेहमीच संशयाच्या भूमिकेतून पाहीले जाते. पुणे प्रकरणातही आरोपी अल्पवयीन असल्याने सुरुवातीच्या एफआयआरमध्ये सदोष मनुष्यवधाचे कलम लावण्यात आले नव्हते. आणि कोर्टाने अल्पवयीन आरोपीला जुजबी अटींवर अवघ्या 15 तासात जामीन दिला. या प्रकरणात मुंबई चहुबाजूंनी टीका झाल्याने अखेर आता पुणे पोलिसांनी बाल हक्क न्यायालयाला आरोपीला सज्ञान समजून कारवाई व्हावी असा अर्ज केला आहे. कोर्टाने यास तत्वत: मंजूरी दिल्याने आरोपीला सज्ञान समजून त्याच्यावर खटला चालणार आहे.
कलम 304 लावणे योग्य – डॉ.पी.एस. पसरिचा
मुंबईच्या वाहतूकीत क्रांतीकारक बदल करणारे माजी आयपीएस अधिकारी पी.एस.पसरिचा यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले आरोपीने गंभीर गुन्हा केला असल्याने त्याला सज्ञान समजून तेव्हाच त्याच्यावर 304 चे कलम दाखल करायला हवे होते. 304 अंतर्गत कमाल दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायलयाच्या भूमिकेवरही वरिष्ठ न्यायालयाकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. आरोपीला माहीती होते की त्याच्याकडे वाहन परवाना नाही. तसेच पालकाने मुलाकडे लायसन्स नसल्याचे माहीती असूनही गाडी ताब्यात दिली. त्यामुळे या प्रकरणात कलम 304 लावणे योग्य असल्याचे माजी आयपीएस अधिकारी डॉ. पी.एस. पसरिचा यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
मुंबईतील काही अपघात
1 ) 29 फेब्रुवारी 2024 : इंटेल इंडियाचा माजी हेड अवतार सैनी यांना पहाटे 5.50 वाजता सायकलींग करताना नेरुळ पाम बिच रोड येथे एका वेगवान टॅक्सी चालकाने उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
2) 20 मार्च 2023 : किंग्ज सर्कल येथे राहणाऱ्या राजलक्ष्मी विजय या 57 वर्षीय सीईओ वरळी सी फेस येथे जॉगिंगला गेल्या असता, त्यांना भरधाव टाटा नेक्सॉनने उडविले. त्या 10-15 फूट हवेत उडाल्या. या प्रकरणात ताडदेवचा रहिवासी सुमेर धर्मेश मर्चंट ( 23 ) याला अटक झाली होती. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा 304 अ चा गुन्हा दाखल झाला होता.
3) मे 2023 मुलुंड पूर्व येथे दोन अल्पवयीन बाईक घेऊन जॉयराईडला गेल्या होत्या. 16 वर्षीय चालकाचे नियंत्रण सूटल्याने बाईक स्पीडब्रेकरवर आदळली. त्यात पाठी बसलेल्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. आपल्या मुलीला लायसन्स नसतानाही बाईकची चावी दिल्याप्रकरणी पालकावर गु्न्हा दाखल झाला.
4 ) 14 जून 2023 रोजी गिरगाव चौपाटीजवळ पहाटे दोन अल्पवयीन मुलांनी कारने बाईकस्वार अकबर खान (42 ) यांच्या बाईकला ठोकरुन जखमी केले. यात अकबर खान यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात त्याच्या पालकांनावर अल्पवयीन मुलाला कार दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मोटार वाहन कायदाप्रमाणे कलम 180 आणि 181 अंतर्गत अल्पवयीन मुलगा आणि पालक दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.
5 ) 14 फेब्रुवारी 2022 रोजी घाटकोपर येथे दु. 3.30 वाजता 17 वर्षीय मुलाने एसयूव्हीने 29 वर्षीय सेल्समन आसिफ शेख याच्या मोटरसायकला मागून धडक दिली. त्याने 200 मीटरपर्यंत मोटरसायकल चाकाखाली फरफटत नेली, वैद्यकीय मदत न देता पळून गेला. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील महेश केणी यांना डोंबिवलीतून अटक झाली.
6 ) जुलै 2016 : एका सतरा वर्षीय मुलाने ड्रायव्हींग लायसन्स नसताना आशिशान सुव्ह चालवून पवई परिसरातील एका वीजेचा खांबाला धडकवली. त्यामुळे ही सुव्ह तटबंदी भिंत तोडून पन्नास फूट खड्ड्यात घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
1,758 रुपयांची फी शिल्लक
पुण्यातील कल्याणी नगरात बिल्डर पूत्र वेदांत याने ज्या महागड्या पोर्श कारच्या धडकेने दोघा सॉफ्टवेअर इंजिनिअरना उडविल्याने त्यांचा मृत्यू झाला ती कार महिनाभरापासून विना नंबरप्लेट पुण्याच्या रस्त्यावर फिरत होती. या गाडीचे परमानंट लायसन्स मार्च महिन्यांपासून मालकाने 1,758 रुपयांची फी न भरल्याने मिळालेले नव्हते अशी माहीती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
तात्पुरते रजिस्ट्रेशन
इलेक्ट्रीक लक्झरी स्पोर्ट्स पोर्श टायकन बांधकाम व्यायसायिक विशाल अगरवाल यानी आपल्या अल्पवयीन मुलाच्या ताब्यात दिल्याचा आरोप आहे रविवारी अपघात घडला त्यावेळी वेदांत याने मद्यप्राशन केले होते. महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की ही पोर्श कार मार्च महिन्यात बंगलुरुच्या डीलरने आयात केली होती. आणि त्यानंतर कर्नाटकातील आरटीओने ती ताप्तुरत्या नोंदणी आधारे महाराष्ट्रात पाठवली होती. जेव्हा या गाडीला पुण्याच्या आरटीओत नोंदणीसाठी आणली तेव्हा तिची रजिस्ट्रेशन फि भरली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मालकाला ही फि भरण्याचे आदेश आरटीओच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
इलेक्ट्रीक कार असल्याने रोड टॅक्स नाही
महाराष्ट्रात इलेक्ट्रीक कारला रोड टॅक्स माफ आहे. आता या पोर्श टायकन मॉडेलचे महाराष्ट्रातील आरटीओत नोंदणी करणे गरजेचे होते. या गाडीच्या रजिस्ट्रेशनची फी केवळ 1,758 इतकी असून त्यात 1500 रु. हायपोथेकेशन फी, 200 रु. स्मार्टकार्ड आरसी बुक फि आणि 58 रु. पोस्टल चार्जेस फिचा समावेश आहे.
कोट्यवधीची किंमत
पोर्श इंडियाच्या वेबसाईटवर या गाडीची एक्स शोरूम किंमत 96 लाखापासून सुरु होते. आणि ती 1.86 कोटी रुपयांपर्यंत आहे.पोर्श टायकन मॉडेलची किंमत या वेबसाईटवर दिलेली नाही. ती कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे शक्यता वर्तविली जात आहे. या गाडीच्या रेकॉर्ड नूसार ही गाडी तात्पुरत्या नोंदणीच्या आधारे या गाडीला कर्नाटक सरकारने ताप्तुरते रजिस्ट्रेशन दिले होते. मार्च ते सप्टेंबर असे सहा महिन्याचे ताप्तुरते नोंदणी प्रमाणपत्र दिले होते. डीलरची यात काही चूक नाही. त्यामुळे या गाडीला रस्त्यावर चालविण्यासाठी आरटीओकडे जाऊन पक्के रजिस्ट्रेशन लायसन्स काढण्याची खरी जबाबदारी मालकाची होती. तात्पुरत्या नोंदणीत वाहन केवळ घर ( गॅरेज ) ते आरटीओपर्यंत चालविण्याची परवानगी असते.
आरटीओ काय करणार कारवाई
ही कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला आता 25 वयाचा होईपर्यंत लायसन्स देण्यासाठी रोखता येईल. मोटार व्हेईकल कायदा प्रमाणे या कारची नोंदणी आता पुढील 12 महिने राज्यातील कोणत्याही आरटीओमध्ये होणार नाही. तसेच कर्नाटक सरकारने दिलेले तात्पुरते रजिस्ट्रेशन देखील कायद्यानूसार रद्द केले जाणार आहे. मोटार कायदा बाल गुन्हेगार ) प्रमाणे कलम 199 अ च्या उप कलमांर्गत वाहतूक विभाग हा निर्णय घेऊ शकतो. या गाडीचा वेळ अपघातावेळी ताशी 160 किमी इतका प्रचंड होता. ही गाडी विना ड्रायव्हींग लायसन्स आणि विना नोंदणी शिवाय चालविणे यासारखे अनेक नियम या प्रकरणात पाळलेले नाहीत. या प्रकरणात ही कार आयात करताना आणखी अटी मोडल्या होत्या का ? किंवा ड्यूटी फि भरायची राहीली होती का ? याचाही शोध घेऊन स्वतंत्र एफआयआर नोंदविला जाणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.