योगेश बोरसे, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे जिल्ह्याला नैसर्गिक संपदा लाभली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पर्यटनाची स्थळे झाली आहेत. लोणावळा, खंडाळासारखे नैसर्गिक हिल स्टेशन पुणे जिल्ह्यात आहेत. या हिल स्टेशनवर देशभरातील पर्यटकांची गर्दी असते. तसेच पुणे जिल्ह्यात पहिले खासगी हिल स्टेशन निर्मितीचा प्रकल्प तयार होत आहे. या बहुचर्चित प्रकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारला जाणार आहे. जगातील सर्वात मोठा हा पुतळा असणार आहे.
पुणे शहराजवळ लवासा या ठिकाणी देशातील पहिले खासगी हिल स्टेशन उभारले गेले आहे. लवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याची उंची जवळपास 190-200 मीटर असणार आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी नरेंद्र मोदी यांचा अतिभव्य पुतळा उभारणार आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील डार्विन ग्रुपचा लवासा खरेदी करण्याच्या प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने (एनसीएलटी) मान्य केला. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा हा देशातील पहिला खासगी हिल स्टेशन प्रकल्प आहे. हा प्रकल्प 1,814 कोटी रुपयांमध्ये ही डार्विन ग्रुपने खरेदी केला. या ठिकाणी डार्विन ग्रुप नरेंद्र मोदी यांचा पुतळा उभारणार आहे. पुतळा उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्त्रायल, फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकचे राजदूतााचा सहभाग असेल, अशी माहितीही मिळाली आहे.
डार्विन कंपनी लवासा प्रकल्पासाठी आठ वर्षात १ हजार ८१४ कोटी रुपये देणार आहे. बँकांची ९२९ कोटी तर घर खरेदी करणाऱ्यांची ४३८ कोटींची भरपाई या कंपनीकडून देण्यात येणार आहे. एकूण १२ हजार ५०० एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. दिवाळखोरीत गेल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते. परंतु आता डार्विन कंपनी हा प्रकल्प विकत घेतल्यामुळे त्यांचे काम सुरु होणार आहे.