पुणे : भाजपाचे राजकारण देश बनवण्यासाठी आहे. भाजपा ही फक्त भारतातील नाही तर जगातील सर्वांत मोठी पार्टी आहे. त्यामुळे तुमची मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. पुण्यातील भाजपा (BJP) पदाधिकाऱ्यांसोबत राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. विश्रांतवाडी भागातील आशीर्वाद पॅलेसमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. 2014 आणि आताचा भारत यात खूप फरक आहे. आज डंके की चोटी पर म्हणू शकतो, की गेल्या 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कामामुळे भारत हा आर्थिक श्रेणीत अग्रेसर आहे, असे ते म्हणाले. महागाईचे खापर त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावर फोडले.
प्रत्येकाला घर, घरात शौचालय, घरात नळ नळात पाणी याची सरकार पूर्तता सरकार करीत आहे. लोकांची जनधन खाती उघडली. भ्रष्टाचाराचा आजार हा भाषण देऊन संपवता येत नाही, त्यासाठी व्यवस्थेत बदल करावे लागतात. हे बदल भाजपा सरकारने केलेत. त्यामुळेच दिल्लीतील बँकेत जमा केलेले 100 रुपये गावातल्या व्यक्तीच्या खात्यावर पोहोचतात, असा दावा त्यांनी केला.
सगळ्या जगात लोकांच्या नजरेत भारताची उंची वाढत आहे. कोरोनाकाळात तिन्ही दलातील सैनिकांनी काम केले. रशिया- युक्रेन युद्ध काळातही भारतीयांना मायदेशी आणण्याचे मोदींच्या पुढाकाराने सैनिकांनी महत्त्वाचे काम केले. मोदींनी रशियाच्या प्रमुखांना सांगितले, मिस्टर पुतीन, जो पर्यंत आमचे भारतीय परतत नाही, तोपर्यंत गोळाबारी करू नका आणि त्यानंतर मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप परत आणले. भारत आता जगातील ताकदवान देश बनला आहे. हम किसी को छेडेंगे नहीं, लेकीन हमे कोई छेडेगा तो उसे छोडेंगे नहीं, असे म्हणत जगातील कोणतीच ताकद भारताकडे नजर वाकडी करून बघत नाही, असा दावा त्यांनी केला.
रशिया युक्रेनमध्ये जी युद्धाची परिस्थिती आहे, त्याचा परिणाम हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारच. त्यामुळे महागाई वाढली. अमेरिका हा तर जगातील सर्वाधिक श्रीमंत देश आहे. तिथे ही प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामानाने भारतातील परिस्थिती चांगली आहे. कार्यकर्त्यांनो हिंमत ठेवा, असा दिलासादायक सल्ला त्यांनी दिला.