देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर, महाराष्ट्रात…; केंद्रीय मंत्र्यांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ramdas Athawale on Devendra Fadnavis : वायनाडबाबत केंद्राने राज्य सरकारला सूचना केल्या होत्या. मात्र राज्य सरकारने लक्ष दिलं नाही. राहुल गांधींनी याबाबत लक्ष द्यायला हवं होतं. परंतु राहुल गांधी यांनी अजिबात लक्ष दिलं नाही, असंही आठवले म्हणालेत. वाचा सविस्तर...
जे. पी. नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. भाजपच्या केंद्रीय अध्यक्षपदाच्या यादीत नितीन गडकरी यांचा नंबर लागलेला होता. महाराष्ट्र हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. जरी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रमध्ये असणारच आहेत, असं रामदास आठवले म्हणालेत. रामदास आठवले आज पुण्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांबाबत काय म्हणाले?
भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे त्यांना कोणालातरी राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा चेहरा विश्वासक आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तरी ते महाराष्ट्रामध्ये असणारच आहेत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तर ती आनंदाची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस राष्ट्राध्यक्ष झाले तर भाजप अजून मजबूत होईल. फडणवीसांचा भाजपला चांगला उपयोग होऊ शकतो. फडणवीस यांना संधी मिळाली तर आम्हाला नक्कीच आनंद होईल, असंही रामदास आठवले म्हणालेत.
राजकारणामध्ये दोघेही राहतील. एकाचं राजकारण होत नसतं. उद्धव ठाकरे म्हणतात एक तर ते राहतील किंवा फडणवीस राहतील. माझे दोघांनाही विनंती आहे की, राजकारणामध्ये दोघांनी राहायला हवं दोघेही माझे चांगले मित्र आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोडलं नाही. एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला हवं होतं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवलं असतं तर ते कदाचित बाहेर आले नसते, असं रामदास आठवले म्हणाले.
मुख्यमंत्री कोण होणार?
लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. यांचा जर वाद मिटला नाही तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार आहे, असं आठवले म्हणालेत.