रवी, तू आमदार होशीलच… गिरीश बापट यांचं खाजगीतलं ते वक्तव्य आठवून रवींद्र धंगेकर भावूक
पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश महानज यांच्या निधनाने आज महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली. एक दिलखुलास, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.
पुणे : फक्त पक्षच नव्हे तर सत्यासाठी गरज पडली तर पक्षाबाहेरील लोकांच्या पाठिशीही उभा राहणारा सर्वसमावेशक नेता अशी ख्याती असलेले भाजप नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांचं आज निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी 7 वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जातील. पुण्यात नुकत्याच गाजलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) निवडणुकीचे विजयी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही बापट यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया दिली. आज बापट यांच्या निधनानंतर त्यांनी खाजगीत बोललेलं एक वाक्य .. रवी तू चांगला कार्यकर्ता आहेस, कधीतरी आमदार होणारच, हे त्यांचं वाक्य वारंवार आठवतंय, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार धंगेकर यांनी दिली. टीव्ही 9 शी फोनवर बोलताना धंगेकर यांनी गिरीश बापट यांच्या राजकीय कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे ज्या रवींद धंगेकर यांच्याविरोधात गिरीश बापट अखेरच्या दिवसांमध्ये प्रचारसभेत उतरले होते, त्याच रवींद्र धंगेकर यांनी विजयी झाल्यानंतर आधी गिरीश बापट यांचे आशीर्वाद घेतले. काही दिवसांपूर्वीच ते बापट यांची भेट घेऊन त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली होती.
रवींद्र धंगेकर भावूक, काय म्हणाले?
गिरीश बापट यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘ गेली ३ दशकं त्यांनी पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांनी योगदान दिलं. फक्त पक्षातच नव्हे तर पक्षाच्या बाहेरील लोकांसाठीही ते सत्याच्या बाजूने उभे रहायचे. पक्षात जे चुकीचे वागत होते, त्यांच्याविषयी ते बोलून दाखवत असत. वरिष्ठ म्हणून त्यांच्या शब्दाला आदर होता. आमच्यासारख्यांसाठी ते आदर्श होते.मीसुद्धा त्यांच्याविरोधात दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. पण कार्यकर्ता म्हणून ते खाजगीत बोलायचे. रवी कधीतरी आमदार होईल.. अशा प्रकारचं सर्वसमावेशक राजकारण त्यांनी केलंय. अशा चांगल्या माणसाला पुण्यनगरी मुकली आहे. एक दिशा देणारं नेतृत्व गमावलं आहे. परिवार आणि पक्षाच्या वतीने गिरीश बापट यांना आदरांजली वाहतो.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक काय म्हणाले?
बापट यांच्या निधनानंतर जगदीश मुळीक यांनीही हळहळ व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ शून्यातून भाजप उभी केली. ते ज्या आजाराशी झुंज देत होते, ती थांबली आहे. त्यांचं निधन पुणे शहराला दुःख देणारं आहे. या दुःखातून आम्ही सावरू शकत नाहीत. परमेश्वराच्या सत्तेसमोर कुणाचा इलाज नसतो. आज भाजप पोरकी झाली आहे. ते कायम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचे. आज त्यांचा पाठिंबा राहिलेला नाही. पुणे शहराकडून मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.
दिलदार व्यक्तिमत्त्व हरपले-मुख्यमंत्री शिंदे
भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. सा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणाले.