Pune water : ‘देखभाल, दुरुस्ती करता मग त्याचे तपशील शेअर करू शकता का?’; पाणीकपातीच्या पालिकेच्या कारणावर पुणेकरांचा भरवसा नाय!
महापालिका देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली बहुतांश शहरातील पाण्याच पुरवठा एक दिवसासाठी बंद करून दुसऱ्या दिवशीदेखील कमी दाबाने पाणी पुरवठा करते. मात्र पुणेकरांना महापालिकेच्या या देखभाल दुरुस्तीच्या कारणावर काही विश्वास नाही, असेच दिसून येत आहे.
पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) अनेक वर्षांपासून दर गुरुवारी देखभाल, दुरुस्तीचे कारण पाणीपुरवठा बंद करत आहे. मात्र, लोकांची गैरसोय करणारी पाणीकपात गरजेची आहे का, असा सवाल पुणेकर विचारत आहेत. एकूणच पुणेकर महापालिकेच्या पाणीकपातीच्या निर्णयावर नाराज आहेत. गुरुवारी (2 जून) शहरातील पाणीपुरवठा खंडित (Water cut) केला जाईल. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, अशाप्रकारचे मेसेज महापालिकेतर्फे दिले जातात. देखभाल आणि दुरुस्तीचे कारण दिले जाते. मात्र देखभाल हे फारच तकलादू कारण आहे, असा सूर पुणेकरांमधून उमटत आहे. तर दुसरीकडे महापालिका अधिकाऱ्यांनी रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी केलेले दावे फेटाळले आहेत. गुरुवारचा पाणीपुरवठा (Water supply) बंद हा पूर्णपणे देखभालीसाठीच केला जातो. आमच्याकडे शहरासाठी पुरेसे पाणी आहे आणि कोणतीही कमतरता नाही, असे महापालिकेच्या पाणी विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले.
‘देखभालीचे तपशील शेअर करू शकता का?’
एका रहिवाशाने ट्विट करत म्हटले आहे, की कृपया, तुम्ही देखभालीचे तपशील शेअर करू शकता का? दर दुसर्या गुरुवारी, देखभालीसाठी पुरवठा कमी केला जातो, या दराने पुण्याला जगातील सर्वात सुव्यवस्थित पाणीपुरवठा असावा! 26 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दुसऱ्या दिवशी शहराला भेट देणार असल्याने पीएमसीने पाणीकपात रद्द केली होती. 28 मेपासून कमी दाबाने पुरवठा होण्यापूर्वी त्या दोन दिवशी (मे 26-27) पाणीपुरवठा सामान्य होता, असे अनेक रहिवाशांनी निदर्शनास आणून दिले.
’26 आणि 27 मे रोजीच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झाला’
कर्वेनगर येथील एका रहिवासी असलेल्या महिलेने म्हटले, की या उन्हाळ्याच्या हंगामात परिसरातील अनेक सोसायट्यांना 26 आणि 27 मे रोजीच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झाला. तर नागरी कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा थांबवण्याऐवजी, महापालिकेने केवळ त्या भागांतीलच पाणीपुरवठा बंद केला पाहिजे, जेथे देखभाल करणे आवश्यक आहे. एकूणच महापालिका देखभाल आणि दुरुस्तीच्या नावाखाली बहुतांश शहरातील पाण्याच पुरवठा एक दिवसासाठी बंद करून दुसऱ्या दिवशीदेखील कमी दाबाने पाणी पुरवठा करते. मात्र पुणेकरांना महापालिकेच्या या देखभाल दुरुस्तीच्या कारणावर काही विश्वास नाही, असेच दिसून येत आहे.