तुतारी चिन्हाच्या अनावरणाआधी सुप्रिया सुळे, रोहित- अजित पवारांची भेट; नेमकं काय कारण?
Rohit Pawar and Supriya Sule Meets Ajit Pawar in Canal Committee Meeting : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा फैसला झाल्यानंतर पहिल्यांदाच काका पुतण्यांची भेट; रोहित पवार-अजित पवारांच्या भेटीचं कारण काय? या बैठकीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित, वाचा सविस्तर...
अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 24 फेब्रुवारी 2024 : अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हदेखील अजित पवार गटाकडे गेलं. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार पहिल्यांदाच त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील यावेळी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. या चिन्हाचं आज सकाळी 10 वाजता रायगडावर अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळे रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये भेट झाली. या तिघांमध्ये पाणी प्रश्नावर चर्चा झाली.
भेटीचं कारण काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजल्यापासून ते अधिकार्यांबरोबर बैठका घेत आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत या बैठका चालणार आहेत. या दरम्यान पुणेकरांसाठी महत्वाचा कालवा समितीची बैठक देखील होत आहे. या बैठकीसाठी आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे पुण्यातील सर्किट हाऊस उपस्थित होते. इथे पाणी प्रश्नावर या तिघांमध्ये चर्चा झाली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
ऊन वाढत चाललं आहे. अशात पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या प्रश्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा- पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. अशात जनावरांसाठी छावण्या उभ्या कराव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी मी इथे आले होते. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना याबाबत कल्पना दिली. तसंच यावर ठोस उपाय करावेत, असंही सुचवलं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजितदादांसोबतच्या भेटीवर रोहित पवार काय म्हणाले?
माझ्या मतदार संघात कुकडीचे पाणी येते. ते १ मार्च पासुन सोडावे. अशी विनंती अजित दादांना केली. ती त्यांनी मान्य केली आहे. माझ्या मतदार संघातील दुसरे आमदार राम शिंदे यांनी कुकडीतुन पाणी सोडण्यास विरोध केला आहे. उजनीतील पाणी वापरणार्या शेतकर्यांना सहापट पाणी पट्टी दर केला आहे. तो कमी करण्यास अजित पवार यांनी सहमती दर्शवली आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचा नियोजित दौरा
पुण्यातील सर्किट हाऊसमधल्या कालवा समितीची बैठकीमध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन ठरवलं जात आह. दुपारनंतर अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघातील, भोर, मुळशी आणि खडकवासला मतदार संघात ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. तसेच काही पक्ष प्रवेश देखील होणार आहेत.