पुणे : एका बाजूला मराठी माणूस, हिंदुत्वाबद्दल भूमिका मांडायची. तेव्हा मनसेने (MNS) आता परप्रांतीयांबद्दलची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केली आहे. तर पहिले त्यांचे भोंगे काढा मग आम्ही भोंगे काढू, असे होणार नाही. सर्वांना समान कायदा लागू होईल, असे यावेळी सचिन अहिर म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. जसे राणा दाम्पत्य असेल अथवा अन्य कोणी त्या सर्वांना कायदा लागू होतोच. तेव्हा कोणी चूक केल्यास कारवाई होणारच, असेही सचिन अहिर यांनी सांगितले. हिंदुत्व आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) भूमिका यावर त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या भूमिकेमुळे अनेक ठिकाणी काकड आरती आणि धार्मिक कार्यक्रमावेळी लाऊडस्पीकर लागले नाहीत किंवा ते कार्यक्रम झाले नाहीत, काय मिळवले हे करून, असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे.
अजाण ही 30 ते 45 सेकंद किंवा फारतर मिनिटभर असते. मात्र आपल्या आरत्या 15 मिनिटे किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा चालतात. एका अजाणमुळे सर्व भोंगे बंद करायची वेळ आली आहे. त्यामुळे हिंदू सणांसाठी तो काळा दिवसच म्हणावा लागेल. याप्रकरणी सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. गृहमंत्र्यांनी आयबीकडूनही अहवाल घेतला आहे. या भोंग्यांच्या आडून काही दंगली, जातीजातीत तेढ निर्माण करत आहे का, हे पाहत आहोत. कायदा-सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. ती आम्ही आता पार पाडणार आहोत. कायदा कायद्याचे काम करेल, असे ते म्हणाले. तर शिर्डीत आरतीसाठी मुस्लीम बांधव समोर आले, यातून सर्व-धर्म समभावाची भावना दिसते. हे राज्यभर दिसेल, असेही त्यांनी सांगितले.
शिवसंपर्क अभियान हे मागील वर्षभरापासून सुरू आहे. उद्धव ठाकरेंची सभा ही शिवसंपर्क अभियानाचा एक भाग आहे. उद्धव ठाकरेंनी यावे, असे विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे मराठवाड्यातील त्या मैदानावर सभा घ्यायची की इतर कुठे याचा प्रश्न नाही आणि शिवसेनेला शक्तिप्रदर्शन करण्याची सेनेला गरज नाही, असे अहिर यांनी सांगितले.