पुणे : मुंबई-पुणे हायवेवरील (Mumbai-Pune highway) वारजे भागातील पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधील पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चारचाकी मोटारीला एका ट्रकने मागील बाजूने धडक दिली. या अपघातात मनोज पुराणिक, त्यांच्या पत्नी, दोन मुली या जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होत्या. परंतु अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूककोंडी (Traffic) झाली होती. या वाहतूककोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणे शक्यच नव्हते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे वारजे वाहतूक शाखेचे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले खरे… पण गर्दी इतकी भयानक होती, की त्यांनादेखील हालचाल करणे शक्य होत नव्हते. पण या अपघातप्रसंगी कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी समीर बागसिराज (Samir Bagsiraj) यांनी या आठ वर्षीय जखमी चिमुरडीला क्षणार्थात स्वत:च्या खांद्यावर घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. त्यांच्या मदतीला राम नवले हे रिक्षाचालकही धावून आले. तिला वेळेत उपचार मिळाले.
एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी, किंवा असा प्रसंग केवळ चित्रपटात पाहता येईल, असे तुमचे मत झाले असेल तर त्याला छेद देणारीच आणि अभिमान वाटावा, अशी ही घटना पुण्यात घडली आहे. राज्यात एकीकडे मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र माणुसकी हा एकच धर्म असल्याचे दर्शन घडले आहे. पुण्यातील वारजे येथील पुलावर झालेल्या अपघातात जखमी चिमुरडीला वाहतूक पोलीस समीर बागसिराज यांनी नव संजीवनी दिली आहे. समीर बागसिराज यांनी केलेल्या मदतीचे आज सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या अपघातात चिमुकलीचे आई-बाबा आणि बहीण यांनाही गंभीर दुखापत झाली होती, परंतु ते कसेबसे रुग्णालयात दाखल झाले. समीर बागसिराज यांनी केलेल्या कामगिरीमुळे चिमुकलीचे बाबा मनोज पुराणिक यांनी खूप आभार मानले. समीर बागसिराज यांनी केलेल्या या मदतीने खरा तो एकचि धर्मचा संदेश गेला, हे नक्की…
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही समीर बागसिराज यांचे कौतुक केले आहे. तसेच पुणे पोलिसांकडूनही बागसिराज यांचा सत्कार करण्यात आला. राजकारणातील मंडळींनी जाती-जातीत तेढ किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी अशा घटनांनी एक चांगला संदेश जात असून राजकीय मंडळींना त्यांच्याच राजकीय भाषेत एका प्रकारे चपराकच म्हणावी लागेल.