‘तो’ बडा नेता सांगतो, तसंच मनोज जरांगे वागतात; आंदोलनातील महिलेचे जरांगेंवर गंभीर आरोप
Sangita Wankhede on Manoj Jarange Patil and Maratha Reservation Andolan : दीड महिन्यांपासून मी मनोज जरांगेंचा विरोध करतेय, विष बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय, असं म्हणत या महिला आंदोलनकर्त्यांनी जरांगेंवर आरोप केलेत. त्या नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...
अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 22 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर असतानाच आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठलेली दिसतेय. मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी राहिलेल्या लोकांकडूनच मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. काल अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज महिला आंदोलकाने मनोज जरांगेंवर आरोप केलेत. मराठा आंदोलन कर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील वागतात, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे.
‘त्या’ नेत्याचा जरांगेंना फोन- वानखेडे
शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं. म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी लावले होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे.
“आधी त्यांच्या बाजूने होते, पण आता…”
मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेड बनवलं. तिथे अंतरवलीत दंगल घडली का घडवली गेली?, सरकारने शोध लावावा. मनोज जरांगे कोण हे मिडीयाला सुद्धा माहिती नव्हतं. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं. तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी त्यांचा विरोध करतेय, असं त्या म्हणाल्या.
वानखेडे यांचे जरांगेंवर आरोप
पण आता एक ते दीड महिन्यांपासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करत आहे. विष बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे कोणाला ही मंदिर विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता, त्यांना मनोज विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता, असं संगिता वानखेडे म्हणाल्या आहेत.