Vasant More : कर्तृत्ववान सरदाराचा मान राखायलाच हवा, ‘सरहद’च्या संजय नहार यांच्याकडून वसंत मोरेंचं कौतुक तर राज ठाकरेंचे टोचले कान
आपल्या प्रभागामधील मशिदींवरचे भोंगे काढणार नाही तसेच मशिदींसमोर हनुमान चालिसाचे भोंगे लावणार नाही. तर सर्व समाजबांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणार, ही भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. या भूमिकेचे कौतुक संजय नहार यांनी केले आहे.
पुणे : मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी घेतलेल्या भूमिकेचे सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी कौतुक केले आहे. वसंत मोरेंना पत्र लिहून त्यांनी आभार मानले आहेत. सरदार मोठा झाला तर राजा मोठा होतो. मात्र राजा मोठा आहे म्हणून सरदार मोठे होतातच असे नाही, याची खात्री मला पटत आहे. तुमच्यासारखे कर्तृत्ववान सरदार हीच पक्षाची, समाजाची शक्ती आहे. तुमच्यासारखे सरदार दुखावले जाऊ नये, त्यांचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा संजय नहार (Sanjay Nahar) यांनी व्यक्त केली आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत वसंत मोरेंनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे नहार यांनी म्हटले आहे. तुमचे कर्तृत्व उजळत राहो हीच सदिच्छा त्यांनी मोरेंना दिली आहे. यासंबंधीचे पत्र वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यानिमित्ताने नहार यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचेही अप्रत्यक्षरित्या कान टोचले आहेत.
वसंत मोरेंचे ‘एकला चलो रे’
आपल्या प्रभागामधील मशिदींवरचे भोंगे काढणार नाही तसेच मशिदींसमोर हनुमान चालिसाचे भोंगे लावणार नाही. तर सर्व समाजबांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणार, ही भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्यानंतर पक्षातूनच त्यांना विरोध झाला. त्यांचे शहराध्यक्षपदही यामुळे गेले. सध्या जरी वसंत मोरे मनसेत असले तरी ते एकाकी पडले आहेत. केवळ राज ठाकरे या एका कारणासाठी ते मनसेत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून तरी स्पष्ट होते. एकला चलो रे ही त्यांची भूमिका मनसे वगळता सर्वच समाजबांधवांना आकर्षित करत आहे. आता त्यांच्या या भूमिकेचे संजय नहार यांनी जाहीर कौतुक केले आहे.
सरहद या शिक्षण समूहाचे सर्वेसर्वा मा.श्री. संजय नहारसाहेब यांनी मला एक खूप अभ्यासपूर्ण पत्र दिले. धन्यवाद साहेब … pic.twitter.com/VFkXRxewPV
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 24, 2022
‘सर्वत्र अंधार नाही’
संजय नहार पत्रात म्हणतात, की एकूणच घडणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होऊन मी हे पत्र लिहीत आहे. तुमच्या राजकीय भूमिका काय असाव्यात, हा तुमचा व्यक्तिगत आणि कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. मीदेखील तुमच्याप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मात्र, सामान्य माणसासाठी आणि प्रभागात शांतता राहावी यासाठी तुम्ही घेतलेली भूमिका आणि त्याची मोजलेली किंमत यामुळे सर्वत्र अंधार नाही, अशी माझी खात्री झाली आहे. आधीच लोक एकीकडे उन्हाने आणि दुसरीकडे असंख्य अडचणींनी गांजले आहेत. त्यांना अस्थिर करू नये, यासाठीची तुमची तळमळ खूप महत्त्वाची वाटते, असे संजय नहार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.