पुणे : देशात सध्या दिलासा घोटाळा सुरू आहे. त्याला विविध कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. इतरांवर ते का सिद्ध होत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना (Shivsena) मेळाव्याच्या निमित्ताने ते सध्या शहरात आहे, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात ज्याप्रकारची राजवट सुरू आहे, त्यावरून असे वाटते की इंग्रजांची राजवट सुरू आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. नवनीत राणा (Navneet Rana) यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या वागणुकीवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी सवाल उपस्थित केला होता, त्यावर विचारले असता त्यांनी केंद्रावर टीका करत इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा चांगली होती, अशी टीका केली.
औरंगाबादच्या मराठवाडा सांकृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक सभा झाल्या आहेत. काल कोणी सभा घेतली म्हणून शिवसेनेची तिथे सभा होत नाही. तर गर्दीने ओसंडून जाणाऱ्या सभा तिथे घेतल्या जातील, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेने जिथे जिथे सभा घेतल्या तिथे इतिहास झाला, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंची सभा झाली म्हणून शिवसेनेची सभा होत असल्याचा आरोप यावेळी संजय राऊत यांनी खोडून काढला.
जे टीका करत आहेत, त्यांचे स्थान काय आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असे कुणीही करू नये. आपला पूर्वइतिहास तपासून आपण राजकारणावर बोलायला हवे, अशी टीका त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. राज्यात बहुजनांचे सरकार आले हा दावा फसवा असल्याचे वक्तव्य पडळकर यांनी केले होते. त्यावर त्यांनी पलटवार केला. कोण बोलत आहे, त्या बोलणाऱ्याची भूमिका काय, राजकारणातले, समाजकारणातले स्थान काय, पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, असे सवाल करत पूर्वइतिहास पाहून बोलावे, अशी टीका पडळकर यांच्यावर केली.