पोर्शे अपघात प्रकरणात ससूनच्या 3 कर्मचाऱ्यांना अटक; डिन विनायक काळेंची पत्रकार परिषद, म्हणाले…
Pune Sassoon Hospital Dean Vinayak Kale on Porsche Accident Update : पुण्यातील ससूनचे डिन डॉ. विनायक काळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निलंबनावर भाष्य केलं. डिन विनायक काळे काय म्हणाले? वाचा सविस्तर.....
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आज ससूनचे डिन डॉ. विनायक काळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ससून चौकशी समितीने काल केलेल्या चौकशी संदर्भात माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे. ससून रुग्णालयातील आतापर्यंत 3 कर्मचाऱ्यांना करण्यात अटक आली आहे. शिवाय ससून रुग्णालय प्रशासनावर लावण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. यावेळी डॉ. विनायक काळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
विनायक काळे काय म्हणाले?
डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. डॉ. विजय जाधव यांच्याकडे चार्ज दिला आहे. अतुल घटकांबळे हा शिपाई आहे. त्याला निलंबित केलं आहे.श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने 28 तारखेला सेवा समाप्त करण्यात आली आहे, असं विनायक काळे म्हणाले.
डॉ. अजय तावरे यांच्याकडे असणार कार्यभार आम्ही काढून घेतला आहे. तर डॉ श्रीहरी हळनोर यांना बडतर्फ केलं आहे. ससून रुग्णालयासाठी ही बाब अत्यंत वाईट आहे. अशा पद्धतीने फेरफार करणं चुकीचं आहे. यासंदर्भात पोलिसांनी जी माहिती मागितली आहे ती त्यांना देण्यात आली आहे. माझ्याकडूनही विभागीय आयुक्त आणि आमच्या वरिष्ठांनी माहिती मागितली आहे. कालच्या चौकशी समितीसोबत मी नव्हतो. ससूनमधील एकूण 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, असंही विनायक काळे म्हणाले आहेत.
वडेट्टीवार यांचा आरोप काय?
पोर्शे कार अपघात प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस आयुक्तांनी फोन केला म्हणून कारवाई झाली नाही का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. आमदाराचे फोन कोणा कोणाला गेले याची चौकशी करा. यात सगळ्यांची भूमिका ही संशयास्पद आहे. राजकीय व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.