हात कलम करण्याचा… महिला अत्याचारावर बोलताना शरद पवारांकडून शिवछत्रपतींचा दाखला
Sharad Pawar on Womens Oppression : मागच्या काही दिवसांपासून वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. पुण्याताली आंदोलनात शरद पवार यांनी महिला अत्याचारावर भाष्य केलं. यावेळी एक शपथही त्यांनी दिली. वाचा सविस्तर....
बदलापूरमधील चिमुकल्या दोन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली. याच विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने यावर टिपण्णी करताना हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून हा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र ठिकठिकाणी ‘निषेध आंदोलन’ केलं जात आहे. पुण्यातही भरपावसात मविआचं हे आंदोलन झालं. या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला दिला.
शरद पवार काय म्हणाले?
अस्वस्थ करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्रछायेखाली एकत्र आलो आहोत. बदलापूरला बालिकेवर अत्याचार झाला. या घटनेने देशभरात महाराष्ट्राच्या लौकिकाला मोठा धक्का बसलाय. राज्यातील मुली- महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारवर आहे, याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही. बदलापूरमधील घटनेचा निषेध होत असतानाच इतर ठिकाणच्या घटनाही उघडकीस आल्या. महाराष्ट्रात दररोज अशा घटना घडत आहेत, असं शरद पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला
महाराष्ट्र हे शिवछत्रपतींचं राज्य आहे. त्या काळात एका भगिनीवर अत्याचार केल्याची तक्रार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे गेली. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याचे हात कलम करण्याचे आदेश दिले आणि त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली. तसंच आता जे काही घडलं आहे. त्याची गांभिर्याने नोंद सरकारने घेतली पाहिजे. संवेदनशीलपणे या गोष्टी हाताळल्या पाहिजेत, असं शरद पवार म्हणाले.
बदलापूरच्या घटनेमुळे महाराष्ट्राच्या लौकीकाला धक्का बसला. या घटनेचा निषेध होत असताना इतर ठिकाणीही अशा घटना होत आहेत. हे राज्य शिवछत्रपतीचं राज्य आहे. शिवछत्रपतींच्या काळात अशा घटना झाल्यानंतर हात कलम करण्याचा निर्णय घेतला होता. अशा अत्याचाराच्या घटना होत असतील तर त्याच्या विरोधात आवाज उचलला म्हणजे राजकारण करतो म्हणणं सत्ताधाऱ्यांचे आहे. हे सरकार असंवेदनशील आहे, असं शरद पवार म्हणाले.