दादांच्या आव्हानानंतर ताई मैदानात…; सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे रस्त्यावर उतरणार

| Updated on: Dec 26, 2023 | 3:19 PM

Supriya Sule and Amol Kolhe Shetkari Akrosh Morch : अजित पवार यांनी आव्हान दिल्यानंतर अमोल कोल्हेंच्या समर्थनात सुप्रिया सुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी मेळावा काढला जाणार आहे. शिरूरमध्ये नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

दादांच्या आव्हानानंतर ताई मैदानात...; सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे रस्त्यावर उतरणार
Follow us on

योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 26 डिसेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिलंय. आगामी निवडणुकीत अमोल कोल्हे यांचा पराभव अटळ असल्याचं अजित पवार म्हणालेत. अजित पवार यांनी आव्हान दिल्यानंतर आता अजित पवारांच्या भगिनी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी होणार आहेत. या मोर्चाबाबत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

उद्यापासून या शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरूवात होणार आहे. 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या काळात हा शेतकरी मोर्चा निघणार आहे. किल्ले शिवनेरीपासून या शेतकरी मेळाव्याला सुरुवात होणार आहे. यात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे रस्त्यावर उतरणार आहेत.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सध्या देशात आणीबाणी सुरु झाली आहे. ही आणीबाणी मोडीत काढली पाहिजे. संविधान वाचवलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. त्यांनी तयार केलेल्या संविधानाला वाचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. संविधानाच्या चौकटीत राहून सरकारने काम केल पाहिजे. शेतकरी विरोधी सरकारला त्याची जागा दाखवायची वेळ आली आहे. त्यामुळे हा शेतकरी मोर्चा आम्ही काढतोय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

उद्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू होत आहे. शिवनेरीपासून हा मोर्चा सुरु होत आहे. 6 मुद्दे घेवून आपण यात्रा करत आहोत. कांद्याची निर्यात बंदी उठवावी. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी. विमा कंपन्याचं धोरण निश्चित करावं. दुधाचे दर पडले आहेत. 26 लाख लिटर दुधाचं कलेक्शन आहे. या दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळवा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अशा आमच्या मागण्या आहेत. त्यासाठी आम्ही उद्यापासून मोर्चा काढतो आहोत, असं अमोल कोल्हे म्हणाले. शरद पवार यांच्या भेटीनंतर ते पुण्यात बोलत होते.