वढू, पुणे : भंडाऱ्यात मतभेद झाले असतील. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करून सोडवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. वढू येथे त्या बोलत होत्या. भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीने भाजपाशी युती करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असे ट्विट करत नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्यावर विचारले असता, याप्रकरणी काँग्रेस आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा करू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच आघाडी आहे. भांड्याला भांडे लागतेच. जे कुटुंब प्रेमळ तिथे भांड्याला भांडे लागते. घरातही सर्वजण राहत असतात. त्यांच्यातही भांडणे होत असतातच. त्यामुळे सगळेच तर एकमेकांना हो म्हणायला लागले तर त्याला दडपशाही (Repression) म्हणतात, जी आमच्याकडे नाही, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.
#Pune : आघाडी आहे. भांड्याला भांडं लागतंच. नाना पटोलेंच्या आरोपांना सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर…
पाहा व्हिडिओ – @supriya_sule @NANA_PATOLE #supriyasule #nanapatole #Politics #pune pic.twitter.com/qzRDFo3uA3— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2022
भंडारा गोंदिया पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला व अनेक ठिकाणी भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. आमचे जयंत पाटील व प्रफुल पटेल यांच्यासोबतसुद्धा बोलणे झाल्यावर यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपासोबत युती केली, गोंदिया जिल्हा परिषदेमध्येसुद्धा राष्ट्रवादी भाजपासोबत युती केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी चर्चा करू, असे सांगत विषय टोलवला.
सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यात. सर्वत्र अस्थिरता दिसत आहे. कोविडमधून बाहेर येवून आर्थिक चक्र आता कुठे सुरू होत आहे. सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्याला केंद्र सरकारने मदत करावी. नोकऱ्या आणि चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी केंद्र सरकार आणि सर्वच राज्यांनी एकत्र येवून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारने महागाईचा प्रश्न सोडवायला हवा, असे त्या यावेळी म्हणाल्या.