पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट, तीन जणांचा जागीच मृत्यू
या तिघांचा मृत्यू अनुक्रमे लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कसबा गणपती मंडळाजवळ झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Pune Three death During Ganpati Visarjan : महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. राज्यात घरोघरी आणि मंडळात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाने १० दिवस पाहुणचार घेतला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. लाडक्या बाप्पाला निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. मात्र आता गणपती विसर्जनला मोठे गालबोट लागले आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाने ही माहिती दिली.
ससून रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीदरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. नयन ढोके (27), विशाल बल्लाळ (35) आणि 45 वर्षीय एक अनोळखी व्यक्ती अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांचा मृत्यू अनुक्रमे लक्ष्मी रोड, टिळक रोड आणि कसबा गणपती मंडळाजवळ झाला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सध्या ससून रुग्णालयाने या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आता हा अहवाल आल्यानतंर या तिघांचा मृत्यू कोणत्या कारणांनी झाला याबद्दलची माहिती समोर येईल, असे ससून रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
परभणीत नाचताना एकाचा मृत्यू
तसेच परभणी जिल्ह्यातील एका 37 वर्षाच्या पुरुषाचा गणपती विसर्जनादरम्यान मृत्यू झाला आहे. परभणीतील जिंतुर तालुक्यात ही घटना घडली. संदीप कदम असे या मृत्यू झालेल्या पुरुषाचे नाव आहे. तो जिंतुरमधील बोर्डी येथील रहिवाशी आहे. संदीप हा विसर्जन मिरवणुकीत डिजेच्या तालावर थिरकत होता. त्यावेळी तो अचानक खाली कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले.
भंडाऱ्यात छत कोसळल्याने महिला जखमी
तर दुसरीकडे भंडाऱ्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान मोठी घटना घडली. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान जीर्ण इमारतीवर चढून विसर्जनाचा आकर्षक देखावा बघत असतानाचा छत कोसळले. या दुर्घटनेत 30 ते 40 महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या बारव्हाजवळ ही घटना घडली. यानंतर जमावाने सर्व टिनाचे शेडच उचलत जखमींना तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही महिला या जखमी झाल्या आहेत.