Uday Samant : दसरा मेळाव्यावरून संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; उदय सामंतांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
Uday Samant on Sanjay Raut : आम्ही कधीच बाप...; ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या घणाघाती टीकेला मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर. शिवसेना पक्षाच्या दसरा मेळाव्यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलंय. त्यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलंय. पुण्यात बोलताना उदय सामंत काय म्हणाले? पाहा...
पुणे | 30 सप्टेंबर 2023, अभिजीत पोते : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी शिवसेना पक्षाची स्थापन केली होती का?, असं म्हणत संजय राऊतांनी ठाकरे गटावर टीकास्त्र डागलंय. या टीकेला आता मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही कधीच नाही म्हणालो की शिवसेना आमच्या बापाची आहे. शिवसेना जशी एकनाथ शिंदे यांच्या बापाची नाही. तशी ती इतर कुणाच्याही बापाची नाही. शिवसेना तर वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे, असं उदय सामंत म्हणाले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय. यंदाचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांचाच होणार आहे. फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा कुठे होणार आहे. हा मेळावा नेमका कुठे होणार हे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आम्ही लोकांना सांगू, असंही उदय सामंत म्हणाले. संजय राऊतांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटात खडाजंगी पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क मैदानावर सभेची परवानगी मागितली आहे. यावरूनच संजय राऊत यांनी आज बोलताना शिंदे गटावर टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली होती का?,असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
सगळ्यांनीच एकमेकांचा आदर केला पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानानंतर पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांनी उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड केली. ही खरी शिवसेना आहे. गेल्यावर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. याही वेळी तिथेच आमचा मेळावा होईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. त्याला आता उदय सामंत यांनी उत्तर दिलं.
दरम्यान, दावोस दौऱ्याचा सगळा खर्च जनतेसमोर मांडणार आहे. एवढ्या खालच्या पातळीवरची टीका राजकारणात होई नये. नुसत्या पत्रकार परिषदा घेऊन टीका करुन काही होत नाही. दौऱ्याला अजून एकही रुपये खर्च झालेला नाही. माझ्या दौऱ्यावर त्यांनी अहवाल घ्यावा आणि कुणाच्या पैशाने गेलो. किती खर्च झाला हे आधी पाहावं, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.