पुणे | 18 सप्टेंबर 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठातंर्गत असलेल्या महाविद्यालयासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिकमधील तब्बल शंभर महाविद्यालयांना नोटीस पाठवली आहे. तसेच या महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकण्यात येणार असल्याचे प्रकुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी सांगितले. विद्यापीठाने घेतलेल्या या भूमिकेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे महाविद्यालये अडचणीत आली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच सर्व विद्यापीठांची बैठक घेतली होती. या बैठकीत ज्या महाविद्यालयांनी ‘नॅक’ म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेचे मूल्यांकन केले नाही, त्यांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले होते. मूल्यांकन न करणाऱ्या राज्यातील महाविद्यालयांची संलग्नता काढून टाकली जाईल, अशी ताकीद दिली होती. त्यानंतर आता पुणे विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील नॅकचे मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांना नोटीस पाठवल्या आहेत.
देशभरातील विद्यापीठे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या म्हणजेच युजीसी अंतर्गत येतात. युजीसी अंतर्गत असलेल्या संबंधित शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांचे मूल्यांकन नॅककडून केले जाते. हे मूल्यांकन करताना शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा, कर्मचारी वर्ग यांचे परीक्षण केले जाते. ही प्रक्रिया पूर्ण करण्याकडे अनेक महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे या कॉलेजवर आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या या भूमिकेनंतर महाविद्यालये अडणीत येणार आहे. त्यांच्यावर संलग्नता काढून टाकण्याची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उच्च व शिक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. नॅकचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता काढून टाकली जाईल, अशा नोटीस पाठवण्याचे आदेश विद्यापीठांना दिले. त्यानंतर पुणे विद्यापीठाने पाऊल उचलत शंभर महाविद्यालयांना नोटीस पाठवल्या आहेत. पुणे विद्यापीठातंर्गत असलेल्या 40 ते 42 महाविद्यालयांनी अजूनपर्यंत एकदाही नॅकचे मूल्यांकन केलेले नाही. तसेच 50 कॉलेजने पुर्नमूल्यांकन केले नाही. यामुळे ही महाविद्यालये आता अडचणीत आली आहे.