Pune water supply : पुणेकरांना मिळणार नियमित पाणी; धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्यानं दिवसाआडची पाणीकपात रद्द
धरणक्षेत्रास सध्या पावसाने उसंत घेतली आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला तसेच पानशेत धरणक्षेत्रात शून्य तर वरसगाव येथे 1 आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 7 मिमी पाऊस पडला आहे
पुणे : पुण्यातील दिवसाआडची पाणीकपात (Pune water cut) रद्द करण्यात आली आहे. अवघ्या दहा ते 12 दिवसांच्या पावसाने शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 20 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) 1 जुलै रोजी घोषणा केलेली दिवसाआड पाणीकपात अखेर मागे घेण्यात आली आहे. शहरात या पुढे नियमित पाणी देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pavaskar) यांनी दिली. जून महिन्यात पावसाचे प्रमाण खूप कमी होते. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी झाला होता. खडकवासला धरण साखळीतील एकूण 30 टीएमसी पाण्याची साठवण क्षमता असलेल्या वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या धरणांमध्ये 2.50 टीएमसी एवढेच पाणी शिल्लक होते. दरम्यान, त्या साठ्यात आता वाढ झाली आहे.
पावसाची उसंत
धरणक्षेत्रास सध्या पावसाने उसंत घेतली आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला तसेच पानशेत धरणक्षेत्रात शून्य तर वरसगाव येथे 1 आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 7 मिमी पाऊस पडला आहे. सध्या या धरणांतील पाण्याचा साठा 20.03 टीएमसी इतका आहे. दरम्यान, पुणे शहरातदेखील पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात संध्याकाळी साडेपाचपर्यंत शून्य मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैअखेर पुन्हा मान्सून सक्रिय होणार आहे.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर केली होती कपातीची घोषणा
राज्याच्या जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला पाण्याच्या परिस्थितीबद्दल सतर्क केले होते. त्याचबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहनही केले होते. त्यानुसार महापालिकेने 4 जुलैपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा करून 30 टक्के पाणीकपात लागू केली होती. त्याचा नियमित वापर 1,650 एमएलडीच्या तुलनेत सुमारे 1,200 एमएलडी होत होता. आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त ही पाणीकपात शिथिल केली होती आणि त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. या नंतर पावसाचे प्रमाणही वाढले आणि दरम्यानच्या काळात धरणे भरल्याने ही पाणीकपात रद्द करण्यात आली आहे.