Pune Rain : पुणेकरांना पावसाने झोडपले, रस्त्यावर पाणीच-पाणी, झाडेही उन्मळून पडली
गेल्या काही दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. पुणे शहरासह जिल्हाभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ तर उडालीच पण आता खरीप हंगामातील पिकांचेही नुकसानीचा धोका आहे.
योगेश बोरसे, Tv9 मराठी, पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजा (Rain) पुन्हा दणक्यात बरसू लागला आहे. आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी या पावसाने पुणेकरांची मात्र, चांगलीच तारांबळ उडवली आहे. शुक्रवारी दुपारी 4 च्या सुमारास पुणे जिल्ह्यात (Pune District) पावसाने हाहाकार घातला होता. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी तर साचलेच होते पण पावसाबरोबर वादळी वाऱ्यामुळे (Stormy winds) अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली होती. येरवाडा भागात रिक्षा मार्गस्थ होत असताना झाड पडल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पार्किंग केलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले आहे.
शुक्रवारी दुपारी पुणे शहरासह जिल्ह्यात वरुणराजाचे पुनरागमन झाले. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ तर उडालीच पण अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सिलिंग कोसळल्याने शासकीय गाड्यांचे नुकसान झाले. यावेळी पार्किंगमध्ये कोणी नसल्याने मनुष्यहानी झाली नाही.
येरवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वाऱ्यामुळे रस्त्याच्याकडेचे झाड उन्मळूनच पडले ते रिक्षावरच. या दुर्घटनेत एका वयोवृद्ध रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. रिक्षाचालकाची ओळख पटलेली नाही. शिवाय झाड बाजूला काढण्याचे काम सुरु होते.
गेल्या काही दिवसांपासून वरुणराजाने उसंत घेतली होती. शुक्रवारी दुपारनंतर वातावरणात बदल झाला. दुपारी चारनंतर पुणे शहरासह जिल्हाभर पावसाने हजेरी लावली होती. आर्धा तासच झालेल्या पावसाने मात्र हाहाकार घातला होता. सखल भागात तर पाणी साचलेच पण अनेक ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत.
रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. रस्तापेठ, कल्याणी नगर, धनकवाडी, कात्रज, पिंप्रीचिंचवड या शहरासह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली होती. धानोरी भागात तर गारांचा पाऊस झाला होता.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याचा शेवट हा पावसानेच होणार होता. त्यानुसार शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.