Pune traffic : नळ स्टॉप-एसएनडीटी मार्गावरच्या वाहतूककोंडीनं पुणेकर हैराण, दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी
या मार्गावरून नियमित जाणाऱ्या एका वाहनधारकाने सांगितले, की कोथरूडकडे जाताना नल स्टॉप चौकाच्या पुढे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी पावले उचलण्याची गरज आहे.
पुणे : वाहतूककोंडीने (Traffic jam) पुणेकर हैराण झाले आहेत. कर्वे रोडवरील नळ स्टॉप-एसएनडीटी मार्गावर आणि आठवले चौकापासून नळ स्टॉपच्या दिशेने लॉ कॉलेज रोडवर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलीस विभागाने (Pune City Traffic Police) नळ स्टॉप चौकात अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले आहे, परंतु वाहतूक योग्यप्रकारे व्हावी, यासाठी दीर्घकालीन उपाय नाहीत. परिणामी सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी दोन्ही चौकांमध्ये वाहतूक ठप्प होत आहे. हे नित्याचेच झाल्याने वाहनधारकही हैराण झाले आहेत. काही अल्पकालीन उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. या मार्गावरील मेट्रोचे (Pune metro) काम पूर्ण झाल्यानंतरच दीर्घकालीन उपाययोजना राबवल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
‘रस्त्याची नियमित देखभाल करावी’
या मार्गावरून नियमित जाणाऱ्या एका वाहनधारकाने सांगितले, की कोथरूडकडे जाताना नल स्टॉप चौकाच्या पुढे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी पावले उचलण्याची गरज आहे. वाहनांचा वेग कमी होण्यापासून रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी रस्त्याची नियमित देखभाल करावी, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
‘मेट्रोचे अपूर्ण काम वाहतूक कोंडीत घालत आहे भर’
कोथरूड येथील एका रहिवाशाने सांगितले, की या मार्गावरील मेट्रोचे अपूर्ण काम वाहतूक कोंडीत भर घालत आहे. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याची काही जागा व्यापली जात आहे. तसेच एसएनडीटी चौकातून वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनांचे बंचिंग कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संपूर्ण मार्गावर एकेरी पर्यायाचा विचार केला पाहिजे, असे म्हटले आहे.
‘वाहतूक पोलिसांशी चर्चा करू’
महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की आम्ही काही मार्गांवर वाहनांची एकेरी आणि दुतर्फा वाहतूक, ट्रॅफिक सिग्नलचा कालावधी पुन्हा सेट करणे, कर्वे रोडवरील काही चौकांमध्ये उजवीकडे वळण यासंबंधीच्या उपाययोजनांवर वाहतूक पोलिसांशी चर्चा करू. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असे महापालिकेतर्फे सांगितले आहे.
मेट्रोचे कामही अद्याप बाकी
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की कामाचा मोठा भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. आम्ही कामासाठी तैनात केलेल्या एजन्सींना रस्त्याची जागा हडप करू नये आणि काम पूर्ण होत असलेले भाग रिकामे करण्यास सांगितले आहे. दरम्यान, महामेट्रोने नळ स्टॉपवरील स्टेशनचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. एंट्री-एक्झिट पॉइंट्सचे काम अजून संपलेले नाही.