पुणे | 21 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्यात सुटीवर गेलेला पाऊस राज्यात परतला आहे. राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यात दोन आठवड्यानंतर पावसाचे पुनरागमन झाले आहे. पुणे जिल्ह्यातील घाटामाथ्यावर शनिवारपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात चांगली वाढ झाली आहे. यामुळे पुणेकरांची पिण्याची पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे जिल्ह्यात आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, कळमोडी धरणातील साठा वाढत आहे. आता जिल्ह्यातील नीरा देवघर धरणही शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या दरवाजांमधून 1340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला गेला आहे. धरणातून नीरा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये कमी अधिक बदल करण्यात येणार आहे. धरणातून विसर्ग होत असल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.
पंधरा दिवस दडी मारलेल्या पावसाने मावळात पुनरागमन झाले आहे. यामुळे भात पिकाचे उत्पादन करणारे शेतकरी समाधान आहे. सध्या सुरु असलेला पाऊस भात शेतीला पोषक आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतेत होता. कारण भात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त होती. मात्र आता मावळात पावसाने पुन्हा हजेरी लावताच शेतकऱ्यांनी शेतात कामाला सुरुवात केली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात रविवारपासून पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर २४ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. लोणावळामध्ये पाऊस सुरु झाल्यामुळे पर्यटक येऊ लागले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
धरणसाठा (टीएमसीमध्ये) | ||
धरण | साठा (टीएमसीमध्ये) | टक्केवारी |
खडकवासला | १.२४ | ६२.९२ |
पानशेत | १०.६५ | १०० |
वरसगाव | १२.०४ | ९३.९३ |
टेमघर | २.७४ | ७३.९८ |
खडकवासला प्रकल्प | २६.६७ | ९१.५१ |
भामा आसखेड | ६.४६ | ८४.२५ |
पवना | ८.३२ | ९५.७५ |