Monsoon : सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार? हवामान खात्यानं काय अंदाज वर्तवला?
1971 ते 2020 या कालावधीत देशातील मॉन्सूनच्या पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 167.9 मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. मात्र यंदा तो 109 टक्के असणार आहे.
पुणे : सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Heavy rain) बरसेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच सप्टेंबर महिन्यात मॉन्सून अधिक सक्रिय राहणार आहे. सप्टेंबरमध्ये जवळपास 109 टक्के हवामानाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. जुलै तसेच ऑगस्टमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली होती. जुलैमधील पावसानंतर तर पुणे जिल्ह्यातील धरणे (Dams in Pune) फुल्ल झाली होती. आता हंगामातील अखेरच्या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या मध्यानंतर वायव्य भारतातून मॉन्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले, की सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण
1971 ते 2020 या कालावधीत देशातील मॉन्सूनच्या पावसाची आकडेवारी पाहता, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरी 167.9 मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. मात्र यंदा तो 109 टक्के असणार आहे.
राज्याच्या सर्वच भागांत बरसणार दमदार
कोकण, मराठवाड्याच्या बहुतांश भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असणार आहे. हवामान विभागाने नकाशा प्रसिद्ध केला आहे. त्यावरूनही हेच स्पष्ट होत आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना स्थिती वर्षाअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक राहण्याचे संकेत वर्तवण्यात आले आहेत.
तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
पुणे शहर तसेच जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ आणि एक-दोन जोरदार सरी कोसळण्याती शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. 2) तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्रवण्यात आला आहे. तर सकाळपासून आकाश स्वच्छ असल्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
ऑगस्टमध्ये कमी पाऊस
जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडणारा महिना ऑगस्ट मानला जातो. मात्र यंदा दरवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये कमी पावसाची नोंद झाली होती. केवळ केवळ 153.3 मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने म्हटले होते.