पुणे दौऱ्यानंतर राज ठाकरेंचा संताप, शिंदे, फडणवीसांना काय म्हणाले?
"राज्य सरकारमधील काही लोक आणि बिल्डर हे सर्व मिळून या गोष्टी सुरु आहेत. त्यामुळे ही शहर अशीच नष्ट होत जाणार, हे कधीही थांबणार नाही", अशी भीतीही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
Raj Thackeray on Pune flood : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी राज्य सरकारसह पालिका प्रशासनावरही संताप व्यक्त केला. महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी यावेळी केला.
“पुण्यात गाड्या वाहून गेलेल्या आहेत. त्यावर विमा देणारे सांगतात की नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही काही विमा देऊ शकत नाही. पण मग जर कोणतीही पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि यामुळे जर नुकसान झालं असेल तर मग राज्य सरकारने यात लक्ष देणे गरजेचे आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतो की मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. त्याचेच हे सर्व चित्र आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.
“ही शहर अशीच नष्ट होत जाणार”
“राज्य सरकारकडून प्रत्येक वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन येतो. पण टाऊन प्लॅनिंग नावाची काहीही गोष्ट नसते. किती गाड्या येतात, किती विद्यार्थी येतात, लोक राहणार कसे याचं काहीही प्लॅनिंग नसतं. टाऊन प्लॅनिंगमध्ये शाळा, कॉलेज, रुग्णालय अशा सर्व गोष्टी असतात. पण ही योजना आपल्या कोणत्याही शहरात राबवली जात नाही. दिसली जमीन की विक असा सर्व प्रकार सध्या सुरु आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील काही लोक आणि बिल्डर हे सर्व मिळून या गोष्टी सुरु आहेत. त्यामुळे ही शहर अशीच नष्ट होत जाणार, हे कधीही थांबणार नाही”, अशी भीतीही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
केंद्र सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही
“पुण्याची पाच शहर झाली आहेत. मुंबईत जेव्हा लोखंडवाला कॉम्प्लेक्स झाले तेव्हा ती एक वेगळी मुंबई झाली. पण पुण्यात हे ज्या वेगाने झालं, ते फारच विचित्र आहे. गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. निवडणुका लागतील तेव्हा आमदारांबद्दल ठरवलं जाईल. त्यामुळे ही जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचं कोणी, हा सर्व प्रशासकीय कारभार चालू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाने यांना धीर द्यायला हवा”, असेही राज ठाकरे म्हणाले.
“ही बाब लाजिरवाणी”
पुनर्विकासाचा मुद्द्यावर तुम्ही तिकडच्या लोकांशी बोलायला हवं. बाहेरुन येणाऱ्यांना तुम्ही फुकट घरं देत आहात आणि इथे राहणारे लोक भिका मागत आहेत. याला सरकार चालवणं म्हणतात का? राज्य म्हणून कोणाचं लक्ष आहे की नाही? प्रत्येक जण आपपल्या राज्याचा विचार करतोय, महाराष्ट्राचा कोणी विचार करणार आहे की नाही? राज्य सरकार आणि महापालिका यांची ही एकत्रित जबाबदारी आहे. तुम्हाला पुण्यात साफसफाईसाठी पनवेल आणि ठाण्यासारख्या ठिकाणावरुन माणसं आणावी लागत आहेत ही बाब लाजिरवाणी आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले.