“राज्याला दोन उपमुख्यमंत्री, एक तर पुण्याचेच, पण तरीही…” राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला
आता रोगराई पसरेल त्याकडे कोण बघणार, एक अधिकारी निलंबित करुन प्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनाच यात लक्ष घालावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray Criticise Ajit Pawar : गेल्या आठवड्यात पुण्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. पुण्यातील अनेक महत्त्वाचे पूल हे पाण्याखाली गेले होते. तर काही भागात जनजीवनही विस्कळीत झाले. पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. आता पुण्यातील परिस्थिती ही पूर्वपदावर आली आहे. मात्र अनेक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावरुन त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज ठाकरेंनी पुणे दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खडे बोल सुनावले आहे.
पुण्यात ज्यांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यांच्या अंगावर फक्त एक कपडा शिल्लक आहे. आता रोगराई पसरेल त्याकडे कोण बघणार, एक अधिकारी निलंबित करुन प्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांनाच यात लक्ष घालावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.
उपमुख्यमंत्री पुण्यातील असताना त्यांनी लक्ष द्यायला नको का?
पुण्यातील नगरसेवकांनी यात जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचे आहे. ज्यांची इच्छा आहे, त्यांनी तरी लक्ष द्यायला पाहिजे. जर एखाद्या मातेला कळत असेल तर ते प्रशासनाला कळत नाही. एखादा प्रकल्प आणायचा असेल तर सर्वांशी चर्चा का केली जात नाही? आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. एकट्या पक्षाच काम नाही. दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहे. ते या ठिकाणी नसतानाही धरणात पूर आला. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी केला.
ही जबाबदारी घेणार कोण?
गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. निवडणुका लागतील तेव्हा आमदारांबद्दल ठरवलं जाईल. त्यामुळे ही जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचं कोणी, हा सर्व प्रशासकीय कारभार चालू असताना याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे प्रशासनाने यांना धीर द्यायला हवा, असेही राज ठाकरे म्हणाले.