पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याला मुंबईत सभा होत आहे.या सभेचा टिझर जारी झाला आहे. धर्म आणि मराठी या दोन विषयांवर वाहिलेला हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. मुंबईत सभेची जोरदार तयारी सुरु आहे. गुढीपाडव्याला होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुंबईत होणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची पुण्यात देखील जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी मेगा प्लॅन तयार केला गेला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या गुढीपाडव्याला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जाहीर सभा घेणार आहेत. या सभेसाठी उभारण्यात येत असलेल्या स्टेजची आज मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनी पूजा केली.
पुणे येथून २० हजार कार्यकर्ते
मनसेच्या मेळाव्याला पुण्यातून २० हजार कार्यकर्ते जाणार आहेत. मनसेकडून शहरात वातावरण निर्मितीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पुणे मनसेच्या शहर कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीला शहरभरातून आणि जिल्हाभरातून कार्यकर्ते आले होते. सभेसाठी मनसेकडून पक्षाचे झेंडे आणि स्टिकर्स वाटले जात आहेत. गुढीपाडव्याला मोठे शक्तिप्रदर्शन करत पुण्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे.
मनसेकडून दावा
राज ठाकरे यांच्या सभेचा टिझर आला आहे. आता गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत राज ठाकरे पिक्चर दाखवतील, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. आता त्याला लाव रे तो व्हिडीओ असणार की अजून काही हे सभेच्या दिवशीच दिसणार आहे.
काय आहे टिझरमध्ये
राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. टिझरमध्ये हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असे म्हटले आहे.
कोणावर साधणार निशाणा
राज ठाकरे यांचे भाषण नेहमीच चर्चेचे असते. त्यामुळे त्याची चर्चा काही दिवस होत असते. आता पाडव्याच्या सभेत सध्याची राजकीय परिस्थितीवर ते काय भाष्य करणार? यावर राजकीय अंदाज आखला जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावर राज काय बोलणार?, उद्धव ठाकरे यांना लक्ष करणार का? शरद पवार यांच्यांवर काय बोलणार? यासंदर्भात उत्सुकता आहे.