पुणेः तुम्ही दिवसातून पाच वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही मशिदीसमोर पाचवेळा हनुमान चालिसा लावू, असा निर्वाणीचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी दिला आहे. ते पुण्यात (Pune) आले असता बोलत होते. राज ठाकरे यांनी अवघ्या पाचेक मिनिटांमध्ये ही पत्रकार परिषद उरकली. येणाऱ्या काळात मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद अशा महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्वाची भूमिका घेतलीय. त्यावरून त्यांच्यावर महाविकास आघाडीतून जोरदार टीका होतेय. राज यांची पाडव्यादिवशी झालेली शिवतीर्थावरील सभा आणि त्यानंतर झालेली उत्तर सभा विशेष गाजली. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी आरोप केले. या सर्व आरोपांना राज आज उत्तर देतील ही अपेक्षा होती. मात्र, त्यांनी त्यावर पुन्हा कधी तरी म्हणून बोलणे टाळले.
राज ठाकरे म्हणाले की, देशातील सर्व हिंदूंना विनंती आहे . त्यांनी तयारीत रहावे. आता तीन तारखेला रमजान आहे. त्यामुळे काही करायचं नाही. सांगायचं नाही. पण तोपर्यंत कळलं नाही समजलं नाही. या देशातील कायगदा आणि सुव्यवस्थेपेक्षा यांना यांचा धर्म महत्त्वाचा वाटत असेल. त्यांना लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील, तर त्यांना जशास तसं उत्तर देणं आवश्यक आहे.
राज ठाकरे म्हणाले की, आमची तयारी सुरू आहे. या देशात महाराष्ट्रात दंगली नकोयत. हाणामारी नकोय. या देशातील महाराष्ट्रातील शांतता भंग करायची इच्छा नाही, पण माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध केलेला नाही, पण त्यांना लाऊडस्पीकरवरूनच ऐकवायचं असेल, तर आमच्याही आरत्या लाऊडस्पीकरवरून ऐकाव्या लागतील. सर्व मशिदीवरील लाऊडस्पीकर हे अनधिकृत आहेत. ते काढले जात नाहीत. तर आमच्या पोरांनी केलेल्या गोष्टी तुम्ही अनधिकृत कशा मानता, असा सवाल त्यांनी केला.
राज म्हणाले की, कोर्टाने म्हटले आहे की, शांतता भंग करत असतील तर अशा भोंग्यांना परमीट देऊ नका. याही पलीकडे आपण काही समजणार आहोत की नाही. मुस्लिमांनाही काही गोष्टी समजल्या पाहिजे. या देशापेक्षा धर्म मोठा नाही. छेडेंगे तो छोडेंगे नाही, म्हणतात. मग आमचे हात काय बांधले आहेत का, असा इशारा त्यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या पीएफला दिला.