मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याच घरात पैसे वाटले, गुन्हा दाखल करा; रवींद्र धंगेकर यांचा मोठा आरोप
कसबा पोटनिवडणुकीत काल दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. संध्याकाळपर्यंत 50.6 टक्के मतदान झालं. कसब्यातील 1 लाख 37 हजार 18 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 2 मार्च रोजी कसबा आणि चिंचवड निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
पुणे : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक संपली असली तरी या निवडणुकीचे फटाके अजूनही फुटत आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली होती. भाजपने कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मतदानाच्या दिवशी उपोषणही केलं होतं. आज तर धंगेकर यांनी मोठा बॉम्बच टाकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात पैसे वाटप केलं. ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं, असा गौप्यस्फोट रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे कसब्यातील उमेदवार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर ,चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी?, असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
मीच विजयी होणार
कसबा पोटनिवडणुकीत मी 15 ते 20 हजार मतांनी निवडून येणार आहे. मी कार्यकर्ता आहे. मला विजयाचा विश्वास आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडून येणं शक्य नसल्यानेच पुण्यात पैसे वाटप केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला. धंगेकर यांनी हा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, धंगेकर या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार की नाही? याबाबत कळू शकलं नाही.
धंगेकरांवर गुन्हा दाखल
कसबा पोटनिवडणूकीतील भाजप उमेदवार हेमंत रासनेसह काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग करत उपोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकालाकडे लक्ष
कसबा पोटनिवडणुकीत काल दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढली. संध्याकाळपर्यंत 50.6 टक्के मतदान झालं. कसब्यातील 1 लाख 37 हजार 18 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. येत्या 2 मार्च रोजी कसबा आणि चिंचवड निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.